महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्टची उचल करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने नागपूर येथील एका एजन्सीला अधिकृत केले आहे. या एजन्सीचे प्रतिनिधी त्यांच्याकडे नाेंदणी केलेल्या हॉस्पिटलमधून नियोजित वेळेत बायोमेडिकल वेस्टची उचलही करतात. परंतु, जिल्ह्यातील तब्बल ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वत:च बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावावी लागत आहे.जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने उचल होत, त्याची विल्हेवाट लागावी, या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मुंबई येथील आयुक्तांना पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली. पण वातानुकूलित कक्षात बसून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे भासविणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यांकडून वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे वास्तव आहे. बायो मेडिकल वेस्ट हे मनुष्यांसह प्राण्यांसाठी हाणीकारकच आहे. इतकेच नव्हे तर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्या गेल्यास गावात एखादी रोगराई पसरण्याची शक्यता राहत असल्याचे सांगण्यात आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळही गप्प?- बायोमेडिकल वेस्ट मनुष्यासह प्राण्यासाठी घातक असल्याने त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे; पण वारंवार निधीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वत:च खोल खड्डा तयार करून जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत डीप बरियल पीटच्या माध्यमातून बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२१ च्या पत्रान्वये कळविली आहे. या प्रकरणी जिल्हा स्तरीय समितीने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
खोल खड्डे करून पुरवावे लागते जैववैद्यकीय कचरा- जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य केंद्राच्या आवारातच डीप बरियल पीट (खोल खड्डा) तयार करून त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील जैववैद्यकीय कचरा पुरवावा लागत आहे.
८७.८४ लाखांची केली मागणी- वर्धा जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्तांना पत्र पाठवून २०२१ साठी ४०.३२ लाख, तर २०२२ या वर्षांसाठी ४७.५२ लाखांची मागणी केली आहे. पण अजूनही या पत्रावर संबंधितांनी ठोस निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले.
बायोमेडिकल वेस्ट मनुष्यासह प्राण्यांसाठी घातकच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात डीप बरियल पीट तयार करण्यात आले असून त्यात बायो मेडिकल वेस्ट पुरविले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील बायो मेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शासनाला निधीची मागणी केली आहे.- डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.