वर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. याच व्याघ्र प्रकल्पात सुमारे आठ प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी बीटीआर-३ ‘कॅटरिना’ नामक वाघिणीची ओळख आहे, तर बीटीआर-७ पिंकी नामक वाघीण ही कॅटरिनाची मुलगी असून तिने तिच्या नैसर्गिक अधिवासात दोन छाव्यांना जन्म दिल्याने ही बाब वन्यजीव प्रेमींसाठी गुड न्यूज ठरू पाहत आहे.
वाघांचा हब अशी विदर्भाची ओळख आहे. त्यातच वाघांसह विविध वन्यजीवांच्या संवर्धनासाठी बोर व्याघ्र प्रकल्प उपयुक्तच ठरणारा आहे. वर्धा जिल्ह्यातील ४०५५१.३८ हेक्टरवर नेहमीच वाघांची मूव्हमेंट राहत असून, या संवेदनशील क्षेत्राचा जास्तीत जास्त परिसर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो, तर अतिसंवेदनशील परिसर हा वन्यजीव विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो. एकूणच वाघांसाठी सुरक्षित स्थळ अशी वर्धा जिल्ह्याची सध्या नवीन ओळख होऊ पाहत आहे. याच वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची राजकन्या असलेल्या पिंकी नामक वाघिणीने आपला नैसर्गिक अधिवास असलेल्या कारंजा तालुक्यातील घनदाट जंगलात दोन छाव्यांना जन्म दिला आहे.
कोअर अन् बफर क्षेत्रात पिंकीचा अधिवास
बीटीआर-३ कॅटरिना ही पिंकी नामक वाघिणीची आई, तर बीटीआर-८ युवराज हा बीटीआर-७ पिंकी नामक वाघिणीचा भाऊ आहे. एरवी कारंजा भागातील जंगल परिसरात वास्तव्य करणारा युवराज नामक वाघ सध्या बोरच्या कोअर क्षेत्रात पाहूणपणासाठी आल्याचे बोलले जात आहे, तर कॅटरिनाची मुलगी पिंकीचा अधिवास बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बझर क्षेत्रात राहताे. याच पिंकी नामक वाघिणीने कारंजा तालुक्यातील घनदाट जंगलात दोन छाव्यांना जन्म दिला आहे.
गस्तीवर असलेल्या चमूला सायटिंग
मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वन विभागाच्या तीन चमू १६ जानेवारीला कारंजा तालुक्यातील जोगा, कन्नमवारग्राम, आगरगाव, रहाटी, नांदोरा शिवारातील गस्तीवर होत्या. गस्तीवर असलेल्या चमूतील अधिकाऱ्यांना बंदर खेकारत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिन्ही चमूने त्यांच्याकडील आधुनिक उपकरणाचा वापर बंदर खेकारत असल्याची माहिती सांगितली. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तांबुळे यांच्या नेतृत्वातील चमूने घनदाट रानतुळस असलेल्या भागात एन्ट्री केली. अशातच त्यांना छाव्यांना सुरक्षित ठिकाणी हलवीत असलेल्या पिंकीची सायटिंग झाली. पिंकी दिसताच इतर दोन्ही चमूंना माहिती देण्यात आली; पण काही क्षणातच अतिशय चपळ असलेली पिंकी तिच्या छाव्यांना सोबत घेत अधिकाऱ्यांना दिसेनासी होत दाट जंगलात गेली.
वन विभाग अलर्ट मोडवर
पिंकी नामक वाघीण तिच्या छाव्यांना तोंडात धरून काही क्षणातच अधिकाऱ्यांना दिसेनाशी होत दाट जंगलात निघून गेल्याने गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनीही ही माहिती जाणून घेतल्यावर वन विभागाच्या तालुका व गाव पातळीवरील अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. एकूणच वन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
ग्रामस्थांना दिल्या जाताहेत मार्गदर्शक सूचना
अतिशय चपळ आणि रुबाबदार असलेल्या पिंकी नामक वाघिणीने तिच्या दोन्ही छाव्यांना गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची नजर चुकवून सुरक्षित ठिकाणी नेले असले तरी तिला आणि तिच्या छाव्यांना धोका निर्माण झाल्याचे तिला जाणवल्यास ती नक्कीच अटॅक करू शकते. त्यामुळे संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टळावा या हेतूने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कारंजा तालुक्यातील जोगा, कन्नमवारग्राम, आगरगाव, रहाटी, नांदोरा आदी गावांमधील नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांनीही संभाव्या धोका लक्षात घेता वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.