मागण्या मान्य : प्रहार अपंग क्रांतीचे पाच तास आंदोलन वर्धा : विविध मागण्यांसाठी बुधवारी पिपरी (मेघे) ग्रा.पं. मध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेने आंदोलन केले. कुणी दखल घेत नसल्याने आंदोलकांनी सरपंच व ग्रामसेवकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या निकाली निघाल्यानंतर कार्यालयाबाहेर जाऊ, अशी भूमिका घेतल्याने ग्रा.पं. प्रशासनात खळबळ उडाली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. प्रत्येक ग्रा.पं.ने अपंगांसाठी असलेला ३ टक्के निधी खर्ची करणे क्रमप्राप्त आहे; पण पिपरी (मेघे) ग्रा.पं. ने तो निधी खर्च न केल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी ११ वाजता प्रहार अपंग क्रांती संघटनेने आंदोलन सुरू केले. दोन तासांतही पदाधिकारी व सचिव न पोहोल्याने आंदोलकांनी सरपंच व ग्रामसेवकांचे दालन गाठले. तेथे ठिय्या आंदोलन करीत मागण्या निकाली निघेपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे तणावाचे वातावरण होते. दरम्यान, सरपंच कुमूद लाजुरकर, सदस्य अजय गौळकर व ग्रामसेवक आसुटकर यांनी कार्यालय गाठले. त्यांनी मध्यस्ती करीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. अपंगांना व्यापारी संकुलात ३ टक्के गाळे राखीव करावे, ३ टक्के निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा, मालमत्ता करात सुट द्या, स्वयंरोजगारास्तव २०० चौरस फुट जागा द्याप या मागण्यांवर लावून धरल्या. ४ वाजता सात लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. शिवाय २० मार्चपर्यंत शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेतले. हनुमंत झोटींग, प्रमोद कुरडकर, विकास दांडगे यासह ५० ते ६० अपंग व कार्यकर्ते यात सहभागी झाले.(शहर प्रतिनिधी)
अपंगांचा पिपरी (मेघे) ग्रा.पं. मध्ये ठिय्या
By admin | Published: March 09, 2017 12:55 AM