१०.६४ लाखांचे लुटमार प्रकरण : भावाचा हिस्सा हडपण्यासाठी रचले नाट्यआष्टी (शहीद) : व्यापाऱ्याला विकलेल्या चण्याच्या चुकाऱ्याचे १०.६४ लाख रुपये लुटल्याची तक्रार शेतकऱ्याने आर्वी पोलिसात केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता अवघ्या सहा तासांतच फिर्यादी शेतकरीच या लुटमार प्रकरणाचा सुत्राधार निघाल्याने एकच खळबळ उडाली. चुकाऱ्याच्या पैशात भावाचा असलेला वाटा हडपण्याकरिता हे नाट्य रचल्याचे तपासात समोर आले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या प्रकरणी तक्रारकर्ता शेतकरी दिनकर खैरकार रा. वाघोली व त्याला यात सहकार्य करणाऱ्या मनीष पाथ्रे रा. सिरसोली या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय तक्रारीत नमूद असलेली रक्कमही पोलिसांनी खैरकार याच्या घरातून जप्त केली आहे. नाट्य रचणाऱ्या दोघांना अटक१०.६४ लाखांचे लुटमार प्रकरण : तीन पोलीस ठाण्यांकडून तपास आष्टी (शहीद) : वाघोली येथील शेतकरी दिनकर खैरकार याने दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडील शेतातील चणा कारंजा तालुक्यातील एका दलालामार्फत आर्वी येथील व्यापारी केशरीलाल अग्रवाल यांना विकला. या मालाचे १० लक्ष ६४ हजार रुपये शेतकरी खैरकार यांना १६ मे रोजी बँकेतून घेण्याचे सांगितले; मात्र मला आताच पैसे पाहिजे म्हणून शेतकरी दिनकर खैरकार व त्यांचा सहकारी मनीष पाथ्रे हे दोघेही आर्वीला गेले.व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार रक्कम दिली. ती रक्कम घेवून हे दोघे आर्वीला निघाले. सायंकाळी ७.३० वाजता जाम शिवारात वादळामुळे पडलेल्या एका बाभळीच्या झाडाजवळ सहा जणांनी लुटल्याचे सांगितले. ते शिख समाजाचे असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात सांगण्यात आले. याची माहिती खैरकार यांच्या मुलाला मिळताच त्याने वडील दिनकर यांना घेवून आर्वी पोलीस ठाणे गाठले. लागलीच ठाणेदार शैलेश साळवी यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तपासाची चाके फिरविली. तळेगाव ठाणेदार दिनेश झामरे, आष्टी ठाणेदार दिलीप ठाकुर, यांच्यासह पोलीस ताफा तपासाला लागला. घटनेची माहिती होताच सहायक पोलीस निरीक्षक जिट्टावर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची चमूही रवाना झाली. शेतकऱ्यांनी सदर लूटारु शिख समाजाचे असल्याचे म्हटल्याने तळेगावच्या बेड्यात संपूर्ण तपासणी केली येथे काहीच निष्पन झाले नाही. पोलिसांनी दोघेही शेतकरी ४० कि़मी. अंतरावर वास्तव्यास असलेल्या वाघोली गावाला आले. येथून तक्रार देण्याकरिता आर्वीला आणले. पोलीस ठाण्यात दोघांचीही वागणूक, चेहऱ्यावरील हावभाव संश्यास्पद वाटत होती. याची माहिती गावात पसरताच तेथील एकाने आर्वी पोलीस ठाणे गाठून पैशाची पिशवी दुचाकीवर बसून दोन्ही शेतकरी घरी आल्याचे पाहिल्याचे सांगितले. ही माहिती ठाणेदारांना मिळताच त्यांनी दोघांनाही तपासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने घटनास्थळी गेले. तेथे गाडी बाभळीच्या झाडात गेली गाडीला मार लागला असे सांगून दिशाभूल केली. गाडीला काहीच मार नव्हता. लागलीच वाघोली येथील घरी गेले पोलीस खाक्या दाखविताच दोघांनीही घरातील १० लक्ष ६४ हजार रुपये लपवून ठेवल्याचे सांगितले. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही रक्कम जप्त करून पोलिसांनी दिनकर खैरकार व मनीष पाथ्रे यांना आर्वीला ठाण्यात परत आणले. दोघांनाही लूटमार व चोरीचा बनाव केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत असून या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
फिर्यादीच लुटमार नाट्याचा सूत्रधार
By admin | Published: May 15, 2016 1:39 AM