नरेश डोंगरे
वर्धा : 'जेव्हा जेव्हा साहित्य राजकारणाच्या मागे मागे फिरले, तेव्हा तेव्हा एकतर राजकारण संपले किंवा साहित्य! हे वास्तव ऐकवून सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि कवी कुमार विश्वास यांनी अखिल भारतीय ९६ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटनसत्र जिंकले.
मुख्य अतिथी म्हणून संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला विश्वास यांना आमंत्रित करण्यात आले होते. मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, माजी खासदार दत्ताजी मेघे, सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉक्टर विश्वनाथप्रसाद तिवारी आदी उपस्थित होते. मात्र मंचावरचे खरे आकर्षण कुमार विश्वास हेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आयोजकांनी प्रारंभी दहा मिनिटांची वेळ दिली होती. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा साधारणता पाऊण तास उशीर झाल्यामुळे आणि भाषणे लांबल्यामुळे आयोजकांनी विश्वासांना बोलण्यासाठी अवघ्या पाच मिनिटांचीच वेळ दिली.
निवेदिकेने भाषणासाठी त्यांच्या नावाची घोषणा करतात संमेलनाचे राम शेवाळकर व्यासपीठ आणि देशाच्या विविध प्रांतातून आलेले नामवंत साहित्यिक कवी तसेच खचून भरलेल्या विनोबा भावे सभागृहातील प्रेक्षकांनी टाळ्या आणि घोषणाबाजी करत कुमार विश्वास यांचे जबरदस्त स्वागत केले. मोजून पाच मिनिटांच्या भाषणात विश्वास यांनी साहित्य, भाषा तसेच राजकीय स्थिती अन् डावपेच यावर मार्मिक प्रहार करत उपस्थित प्रत्येकाची प्रचंड दाद मिळवली. ज्या भाषेने मला मोठा मानसन्मान, प्रतिष्ठा दिली. त्या भाषेच्या अर्थात हिंदीच्या साहित्य संमेलनात एवढी प्रचंड गर्दी आपण कधीच बघितली नाही, जेवढी आज मराठी भाषेच्या संमेलनाला बघतो आहे, असे म्हणत त्यांनी मराठी भाषिकांच्या मनाचा प्रारंभीच ठाव घेतला.
लोकमान्य टिळक आणि गीतादर्शनाचा हवाला देत कुमार विश्वास म्हणाले की, आपल्याला कर्मयोगावर एवढे विस्तृत लिखाण का करण्यात आले ते मला अभ्यासातून कळले. राजकारणाला दशा अण दिशा दाखविण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. राजकीय नेत्यांना सांभाळून घेण्याचीही जबाबदारी साहित्यिकांची आहे. या संबंधाने त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर संमेलनाची परंपरा सुरू केली. १८५२ ला संमेलनाच्या मंचावर चढताना पंडित नेहरू यांचे पाय काहीसे डगमगले. मात्र, त्यांच्या मागे असलेले साहित्यिक दिनकर यांनी त्यांना लगेच आधार देऊन सांभाळले. त्यानंतर मंचावर पंडितजी आणि साहित्यिक दिनकर एकमेकांशेजारी बसले असताना पंडितजींनी दिनकर यांच्याकडे बघून आपल्याला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद दिले. यावर दिनकरजी यांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला ही शिकवण दिली, त्याचेच मी पालन केल्याचे नम्रपणे सांगितले.
पुढे पुढे करणाऱ्यांना चिमटा
प्रत्येक वाक्यावर टाळ्या घेणाऱ्या कुमार विश्वास यांनी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगला चिमटा काढला. आयोजक आणि मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांनी यापुढे मागे दूरवर बसलेल्या साहित्यकांना समोर बसवण्याची (पुढे आणण्याची) जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे म्हणून टाळ्या घेतल्या.
राजकीय स्थिती आणि माध्यमांच्या जबाबदारीवर अत्यंत कमी शब्दात व्यक्त होताना त्यांनी म्हटले की, अर्थसंकल्प आल्यावर मला अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया विचारली. मी म्हटले की, चांगले बघायचे असेल तर हे चॅनल बघा आणि वाईट बघायचे असेल तर ते चैनल बघा.
प्रसारमाध्यम आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवर बोट ठेवताना कुमार विश्वास यांनी जे वास्तविक दाखवत होते ते चॅनलच' विकत घेतल्याचे सांगून उपस्थितांची दाद मिळवली.
अहंकार, दिल्ली आणि महाराष्ट्र !
महाराष्ट्रातील साहित्याची शेवटच्या टप्प्यात प्रशंसा करताना कुमार म्हणाले की, जेव्हा केव्हा भारतीय लोकशाहीला दिल्लीच्या अहंकाराने पछाडले तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातून या देशाला दशा आणि दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे.