कविसंमेलन : राष्ट्रीय कवी कला मंचाचा अभिनव उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो. दु:खितांच्या असह्य वेदनांवर फुंकर घालण्याचे कार्य त्यांच्या काव्यमय शब्दांनी केले जाते. असाच प्रत्यय कुष्ठरोगी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर त्यांना भावनिक आधार देण्यासाठी व आत्मिक बळ देण्यासाठी आयोजित कवी संमेलनात आला. स्थानिक राष्ट्रीय कवी कला मंचाच्यावतीने महारोगी सेवा समिती दत्तपूर येथे आगळ्या-वेगळ्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. करुणाकरण तर अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र, ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील, साहित्यिक प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. प्रमोद नारायणे, कलामंचचे संयोजक रमेश खुरगे उपस्थित होते. यावेळी जयश्री कोटगीरवार या कवयित्रीने ‘शेतकरी बापा’ ही कविता सादर केली. ‘मरणं लई सोपं बापा, जगणं आहे हिमतीच, हातात घेऊ हात आपण, जीवन लाख किंमतीचं’ असा आधार शेतकरी बापाला दिला. सुनील सावध यांनी ‘चुल पाहे विस्तवाची वाट, शेतकऱ्यांचे मुल पाहे भाकरीचे ताट’ या ओळीतून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे चित्रण केले. प्रा. प्रमोद नारायणे यांनी किती संकटे आली गेली, किती कोसळले घाट उभे, हिमालयाच्या शिखरावरती पुन्हा एकदा चढून पाहू ही माणसाला हिंमतीने जगणे शिकविणारी कविता सादर करीत उपस्थितांमध्ये जोश आणला. मिरा इंगोले यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान कवितेतून मांडले, दत्तानंद इंगोले या कवीने हिमालयाची उत्तुंगता वाढत असली तरी, माणसा-माणसातच द्वेषभाव पेरीत जाणारा हा देश! अशी व्यथा व्यक्त केली. रमेश खुरगे यांनी ‘जमीन को बेच के सरकारी काम कर रहा हूं, झुठे झुठे आकडे रेकॉर्ड कर रहा’ ही भ्रष्टाचारावर आधारित हिंदी रचना सादर केली. प्रा. अरविंद पाटील यांनी ‘बेमुदत पावसाचा संप’ या कवितेतून’ विनाकारण पाऊसही करतो राजकारण, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतो पाणी विनाकारण’ असे चित्र उभे केले. याप्रसंगी प्रशांत ढोले, संजय भगत, स्कर्मिश खडसे, प्रभाकर पाटील, सुरेश मेश्राम, प्रा. जनार्दन दंदगाळे, भास्कर नेवारे, प्रा. प्रफुल बन्सोड, वंदना कोल्हे, गणेश वाघ, सुरेश सत्यकार, वसंत करोडे, गिरीश उरकुडे आदी कविंनी भावस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. बहिरशेट यांनी बासरीवादन सादर केले. प्रास्ताविक व भूमिका खुरगे यांनी विषद केली. परिचय डॉ. विद्या कळसाईत यांनी करून दिला. संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तर आभार प्रा. नारायणे यांनी मानले.
दु:खितांच्या वेदनांवर कवितांची फुंकर
By admin | Published: May 23, 2017 1:06 AM