केळझर येथील घटना : चार सुरक्षा रक्षकांनाही डांबलेवर्धा : फायनान्स कंपनीकडून आलो, मशीन पाहायची आहे असे म्हणत २५ ते ३० लोकांनी केळझर येथील गिट्टी खदानीतून पोकलॅन व बे्रकर मशीन पळविली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात सुरक्षा रक्षकांनाही डांबून ठेवल्याने दरोड्याचा संशय बळावला आहे; पण सेलू पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.केळझर येथील नरेश दयानी यांच्या खदानीवर बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० इसम पोहोचले. त्यांनी आम्ही मशीन चेक करायला आलो, गेट उघडा, असे कर्मचाऱ्यांना सांगितले; पण कर्मचाऱ्यांनी सकाळी या, असे सांगितले. यावरून सर्व इसमांनी कर्मचारी गजानन शिंदे, श्रीराम किंगोर, विनोद पंधराम व दौलत कातलाम यांना गाडीत डांबून ठेवले. मोबाईल हिसकावून घेतले. यानंतर सोबत आणलेल्या ट्रेलरमध्ये दयानी यांच्या खदानीवरील एक पोकलॅन व एक ब्रेकर मशीन किंमत ६५ लाख रुपये उचलून नेली. डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना या इसमांनी सेलू येथे फिरवल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर खदान मालक नरेशकुमार दयानी यांनी सेलू पोलिसांत तक्रार दिली; पण या वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ही कारवाई फायनान्स कंपनीने केल्याची माहिती आहे; पण मध्यरात्री दीड वाजता, कर्मचाऱ्यांना डांबून, त्यांचे मोबाईल हिसकावून कारवाई करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यरात्रीच्या या प्रकारामुळे दरोड्याचा संशय बळावला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सदर प्रकरण चौकशीत ठेवले असून संबंधित फायनान्स कंपनीला ई-मेल पाठवून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर पुढील तपास केला जाणार आहे.- संतोष बाकल, पोलीस निरीक्षक, सेलू.
पोकलॅन व ब्रेकर मशीन पळविले
By admin | Published: March 27, 2016 2:10 AM