वर्धा : कोंबड्यांची झुंज लावून हारजीतीचा जुगार भरविणाऱ्या १४ जुगाऱ्यांना सेलू पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जुगारातील रोख रकमेसह १४ दुचाकी तसेच इतर साहित्यही जप्त केले. ही कारवाई सेलू पोलिसांनी नजीकच्या चिचघाट शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास केली.
चिचघाट शिवारात पडीत असलेल्या सागवानीच्या बनात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार भरविल्याची माहिती सेलू पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत पथक तयार केले. लगेच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कंगाले, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, मारोती वरठी यांच्यासह कर्मचारी रवाना होऊन चिचघाट परिसरात सापळा रचला. त्यांनी पाहणी केली असता माणिक तुमडाम याच्या शेताजवळ असलेल्या पडीत सागवानाच्या बनात नागरिकांची गर्दी दिसून आली.
तसेच काही जुगारी हे दोन कोंबड्यांमध्ये एकमेकांसोबत झुंज लावून त्यावर पैशाचा जुगार खेळताना दिसून आले. काही जुगारी पोलिसांना पाहून घटनास्थळाहून पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून २४ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करुन सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच १४ दुचाकी जप्त करुन पोलीस ठाण्यात लावल्या.
नागपूर जिल्ह्यातील जुगाऱ्यांची संख्या जास्त
सेलू पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असता नागपूर जिल्ह्यातील जुगाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सचिन बापूराव कुबडे रा. गोंडखैरी, दिनेश रुपचंद साठोडे, रा. गुमगाव, अमोल रमेश पराते रा. आंजी मोठी, विनोद ज्ञानेश्वर भोसले, रा. धपकी, चंदू गणेश भोसले, रा. धपकी, नेहार घनश्याम भोपचे रा. भवानीनगर जि. नागपूर, नंदकिशोर प्रेमचंद्र चकोले रा. पार्डी, मंगेश महादेव मनगटे, रा. भांडेवाडी नागपूर, प्रमोद अरुण चकोले रा. दिघोरी, अश्विन मोहन मसराम रा. मदनी दिंदोडा, अजय रामू डायरे रा. घोराड, स्वप्नील अंकित लक्ष्मीनारायण साहू रा. इतवारी गल्ली नागपूर, राहुल रामा उमरेडकर रा. नागपूर, रामदास फजितराव बोरीकर रा. जुनी मंगळवारी नागपूर यांना अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.