वर्धा : निराधार असलेल्या माय-लेकी १० वर्षांपासून आर्वी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यालगत छोटी खानावळ चालवून उपजीविका करीत होत्या; मात्र अचानक बांबूच्या उभारलेल्या छोट्या झोपडीला आग लागून सर्वच साहित्य खाक झाले. अखेर ‘खाकी’ने माणुसकी दाखवून आर्थिक मदत देऊन त्या म्हातारीला पुन्हा झोपडी उभारुन देत खानावळीचे साहित्य आणून तिला मायेची ऊब दिली.
रेश्मा सावरकर ही वयोवृद्ध आणि मुलगी मीना रा. विठ्ठल वॉर्ड या दोघींनी आर्वी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्याकडेला बांबूची छोटी झोपडी उभारुन तेथे झुणका-भाकर विक्री करीत होत्या; मात्र रात्रीच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागून सर्व साहित्य खाक झाले. दुसऱ्या दिवशी त्या झोपडीजवळ आल्या असता त्यांना ही बाब दिसली. नशिबाला दोष देत त्या घरी परत गेल्या. आठ दिवसांचा कालावधी उलटला; परंतु ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही आणि या दोघी निराधार मायलेकीनेदेखील कुणापुढे हात पसरविले नाही.
भाकरी-पोळ्या तयार करणारी वयोवृद्ध म्हातारी काही दिवसांपासून दिसत नसल्याचे पोलीस ठाण्यातील कर्मचारी अतुल भोयर, राहुल देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी माहिती घेतली असता, त्यांना त्या आजीबाईची खानावळ आगीत खाक झाल्याचे दिसून आले. त्यांनी म्हातारीची भेट घेऊन माहिती घेतली आणि तिची आपबिती ऐकून ‘खाकी’तील माणुसकी जागी झाली. अतुल भोयर, राहुल देशमुख यांनी आपल्या काही पोलीस मित्रांना याची माहिती दिली. दरम्यान अमोल बर्डे, स्वप्नील निकुरे, गुहरक्षक अंकुश दरोई आदींनी आपापल्या परीने मदत करून ३० ते ३५ हजारांची रक्कम जमा करून नव्याने निराधार म्हातारीला झुणका-भाकर व्यवसाय उभा करून दिला. त्यामुळे पुन्हा या माय-लेकींना उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा झाला.
काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. एक मुलगी आहे तिचे पालनपोषण करावे लागते. निराधाराचे पैसे मिळतात; पण तेवढ्यावर उपजीविका चालत नाही. त्यामुळे १० वर्षांपासून पोलीस ठाण्यासमोर पोळ्या, भाकरी करून छोटी खानावळ चालवते; मात्र अचानक एक दिवस आग लागल्याने सर्व जळून गेले; मात्र त्यानंतर राहुल देशमुख, अतुल भोयर आणि काही पोलीस दादा देवदूतासारखे धावून येत त्यांनी मदत करून नवीन व्यवसाय उभा करून दिला. त्यांनीच त्याचे नाव महाराष्ट्र झुणका-भाकर केंद्र ठेवले.
रेश्मा सावरकर, निराधार महिला.