व्यापाऱ्याकडून शेतमालाच्या रक्कमेसाठी केली जात होती टाळाटळालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विकलेल्या शेतमालाची रक्कम व्यापाऱ्याकडून सालोड (हिरापूर) येथील ३३ शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्या जात होती. शेवटी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदारांना याबाबतची माहिती देत सावंगी पोलिसांना दिली. पोलिसांसह आमदारांनी सदर समस्या लक्षात घेत मध्यस्थी केल्यानंतर या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने अर्धी रक्कम दिली.नागपूर येथील महालक्ष्मी अॅग्रोचे सुदर्शन राव नामक व्यापाऱ्याला सालोड (हि.) येथील ३३ शेतकऱ्यांनी तूर,चणा विकला होता. शेतमाल खरेदी करतेवेळी व्यापाऱ्याने शेतमालाची रक्कम तात्काळ देण्यात येईल, असे सांगत धनादेश दिले होते. परंतु, ते वटलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ३३ शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती आमदारांना दिली. व्यापारी सुदर्शन राव यांचे वडील सालोड (हि.) येथे शेतकऱ्यांना चुकारे देण्यासाठी मुदतवाढ मागण्यासाठी आले असता त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी कमलाकर लाडेकर यांच्या घरात बंदिस्त केले. दरम्यान कुचेवार यांनी आ. भोयर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सालोड (हि.) गाठल्यानंतर व्यापाऱ्याच्या वडीलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आमदारांसह पोलिसांच्या मध्यस्थीअंती शेतकऱ्यांना १० लाख ५० हजाराची अर्धी रोख रक्कम देऊन उर्वरित ९ लाख ५० हजाराची रक्कम ८ दिवसांत देण्याचे मान्य केल्याने व्यापाऱ्याच्या वडीलांना सोडण्यात आले.
आमदारांसह पोलिसांच्या मध्यस्थीअंती मिळाली अर्धी रक्कम
By admin | Published: June 06, 2017 1:15 AM