वर्धा : आजकाल रस्त्यावर वाढदिवस साजरा करणं मोठ्या प्रमाणात वाढलंय. मध्यरात्री रस्त्यावर आरडाओरड करून, मोठं मोठाल्या आवाजात गाणी लावून अनेकजण वाढदिवस साजरा करतात. मात्र त्यांच्या आनंदाचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. या प्रकारावर आळा घालण्याकरता पोलिसांनी कंबर कसली आले. रात्री १२ वाजल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला त्यांचा केक तुरुंगात खावा लागणार आहे.
गेल्या महिनाभरात हिंगणघाट आणि रामनगर पोलिसांनी अशांवर कारवाई करत त्यांना कारागृहाची हवा दाखवली आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन शस्त्राने केक कापणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास मुलाचा, नेत्याचा किंवा विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सुरू आहे. ‘भाईगिरी’ची क्रेझ असलेले युवक धारदार शस्त्र जसे की, तलवार, चाकू, कोयता आदीने केक कट करुन डीजेच्या आवाजावर थिरकून वाढदिवस साजरा करत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन होत असून, नागरिकांना त्रास होत असल्याने अशांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले आहे.
तर गुन्हा होणार दाखल- रस्त्यावर वाहन उभे करुन केक कापणे.- केक कापताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरणे.- रस्त्यावर गोंधळ घालणे.- ‘भाईगिरी’चे भूत असल्याने हा प्रकार सोशल मीडियावर अपलोड करणे.- शांतता भंग करुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे.
जिल्ह्यात तिघांवर झाली कारवाई
मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर हातात धारदार शस्त्र घेऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना कारागृहाची हवा खाऊ घातली आहे. हिंगणघाट पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडीओवरुन दोघांना अटक करत त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले. तर रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरात केक कापण्यापूर्वीच शस्त्रासह युवकाला अटक करुन कारागृहात डांबले.
विकृत पद्धतीत होतेय वाढ
सोशल मीडिया येण्यापूर्वी काही मोजक्याच क्षेत्रातील व्यक्तींचा, लहान मुलांचा अथवा ज्यांच्याकडे संपत्ती, प्रतिष्ठा आहे, अशा व्यक्तींचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असे. त्याची चर्चा सर्वत्र व्हायची. मात्र, सोशल मीडियामुळे मात्र आता कुणीच मागे राहिले नाहीत. वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. त्यासाठी मित्रांसह आई-वडील, नातेवाईकांचा आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते. मात्र, आता त्याला फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन, धांगडधिंगा अशा प्रवृत्तीत वाढ होत आहे. विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या जोमात आहे.