कारंजा (घा.) : येथील नगरपंचायतीत काँग्रेसची सत्ता आहे. पण याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आता सुरुंग लागत काँग्रेसच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि कारंजा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी थेट शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने कारंजात राजकीय भूकंपच आला आहे. काँग्रेसला बाय-बाय करणाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.
कारंजा नगरपंचायतीत काँग्रेसचे नऊ तर भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक आहेत. बहुमताचा कौल काँग्रेसला मिळाल्याने नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. तर नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसला मोठे यश मिळाले. बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आली. पण काही दिवसांपासून राजकीय घुसमट होत असल्याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेसच्या अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि कारंजा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या : अमर काळे
काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या या म्हणीतच सर्व काही दडलेले आहे. कारंजा शहरातील जनता सुजाण असून सर्व ओळखून आहे, असे संबंधित प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.