वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:24 AM2018-09-27T04:24:15+5:302018-09-27T04:24:19+5:30
सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.
- अभिनय खोपडे
वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सेवाग्राम परिसरातील जागांची पाहणी केली. मात्र सर्व सेवा संघ, आश्रम प्रतिष्ठान व नयी तालीम या संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या जागा राजकीय कार्यक्रमांसाठी देण्यात येत नाही. तसा ठराव आता नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळातच झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीसाठी आवश्यक असलेली जागा आश्रमात उपलब्ध नाही, असे सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते आमदार रणजीत कांबळे म्हणाले की, आश्रम प्रशासनाने काँग्रेसला परवानगी नाकारलेली नाही. आश्रमात राजकीय कार्यक्रम घेता येत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आश्रमच्या बाहेर कार्यक्रम घेता येऊ शकतो. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अशोक गहलोत यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची व सभागृहाची पाहणी केली. मात्र येथे लीफ्टची व्यवस्था नसल्याने येथे कार्यकारिणीची बैठक घेण्यास अडचण निर्णय होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वीही नाकारले कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये पक्षाचे अधिवेशन घेण्यासाठी आश्रम प्रतिष्ठानकडे जागा मागण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नव्हती. त्यांच्या घटनेत याबाबीची तरतूद आहे, अशी माहिती सुरेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बैठक रद्द होण्याची शक्यता
सेवाग्राम येथे १५० व्या गांधी जयंतीनिमित्त आश्रम प्रतिष्ठानचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहेत. तर राज्य शासनाने ७ दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी आश्रमच्या बाहेर पण प्रतिष्ठानच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आश्रम परिसरात जागा उपलब्ध नसल्याने काँग्रेसची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.