समीर कुणावार : उड्डाणपुलाचे काम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेने रंजल्या गाजल्या, पीडित व दु:खितांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणे या एकमेव ध्येयाने मी हे समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे. हा घेतलेला वसा मी कधीही टाकून देणार नाही. विकासाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत सदैव अग्रेसर राहील, असे मत आ. समीर कुणावार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी वणा नदीवरील पंडित दीनदयाल उपाध्याय उड्डाणपुलाचे काम त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. वणा नदीच्या पात्रात आकाशाच्या खुल्या मंडपात सायंकाळी ६.३० वाजता पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, प.स. सभापती गंगाधर कोल्हे, उपसभापती धनराज रिठे, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष उषा थुटे, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, जि.प. सदस्य शरद सहारे, आकाश पोहणे, अंकुश ठाकुर उपस्थित होते. आ. कुणावार यांनी वणा नदीवर पूल व्हावा ही जनतेची मागणी होती. निवडणुकीत मी ग्वाही दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने आज या पुलाची निर्मिती होत आहे. खासदार, आमदार, जि.प., पं.स., नगरसेवक हे जनतेचे विश्वस्त आहे. जनता सर्वतोपरी आहे, या भावनेतून जनविश्वासाने विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. हा उड्डाण पूल केवळ पूल नसून समृद्धी मार्ग आहे. पुलामुळे ग्रामीण समृद्धी शहरात येईल व शहरातील लक्ष्मी शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे. उद्योग व शेतीच्या विकासाला या पुलामुळे चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले. बसतांनी, दिघे, सहारे यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी दिलीप कुटे, कंत्राटदार शेख यांचा खा. तडस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. किरण वैद्य यांनी, प्रास्ताविक दिघे यांनी केले तर आभार रिठे यांनी मानले.
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी राजकारण करणार
By admin | Published: May 15, 2017 12:35 AM