लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोस्ट विभाग म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर खाकी वेशात पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका उभे राहतात. मात्र, बदलत्या काळात पत्रव्यवहार कमी झाल्याने परिवर्तनाची चाहूल लागताच पोस्टल विभागामध्येही अनेक बदल झालेत. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून घरपोच बँक सेवा दिली जात आहे. वर्ध्यातील २७ उपडाकघराअंतर्गत ‘पोस्ट वरियर योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. कधीकाळी पोस्ट कार्ड घेऊन येणारे पोस्टमन काका आता बँक व्यवहाराकरिता येत आहेत.
भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्यावतीने तसेच महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलतर्फे १ जून ते ३१ ऑगस्ट २०२० पासून ‘पोस्टल वरियर योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा डाकघर विभागाच्यावतीने २७ उपडाकघरांतर्गत येणाऱ्या १५६ शाखा डाकघरांमार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून घरबसल्या विद्युत देयक अदा करता येते.
नवीन शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता आयपीपीबीचे खाते उघडता येते. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांचे, गॅस अनुदानाकरिता लाभार्थ्यांचे, मातृत्व वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी मातांचे आणि मनरेगाअंतर्गत काम करणाºया व्यक्तींचे आयपीपीबीचे खाते उघडता येते. यासोबतच गावातील लोकांना त्यांचे कुठल्याही बँकेत जेथे आधार संलग्न आहेत, तेथून गावातच पोस्टद्वारे रक्कम आधार इनेबल पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून घरबसल्या विनाखर्च काढता येते . आदी विविध सुविधा पोस्ट विभागाने उपलब्ध केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे.
पोस्ट कर्मचारी आपल्या दारीसध्या कोरोनामुळे कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अशात पैसे काढण्यासाठीही बँकेसमोर मोठी गर्दी होत होत असल्याने नागरिकांना काही तासन्तास उभे राहून खूप त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करूनच गावातील नागरिकांना बँकेत न जाता घरबसल्या पैसे काढता यावे, याकरिता पोस्ट ऑफिसचे कर्मचारी दारी पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून कुठल्याही बँकेतून पैसे काढण्यासाठी मदत करीत आहे. याकरिता वर्धा डाक विभागाचे अधीक्षक मनोहर लाखोरकर, मुख्य पोस्ट मास्टर अविनाश अवचट, सहायक अधीक्षक विलास भोगे, सहायक अधीक्षक प्रभू आदी प्रयत्नरत आहेत.
जिल्ह्यातील १५६ शाखा डाकघरांमार्फत ‘पोस्टल वरियर योजना’ राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य घरबसल्या त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध बँकिंग सेवा सुरू केली असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा.-अविनाश अवचट, मुख्य पोस्ट मास्टर, वर्धा.