ग्रेट बॅकयार्ड बर्डकाऊंट अंतर्गत नोंद : पक्ष्यांच्या नोंदी संकेतस्थळावर वर्धा : जागतिक स्तरावर १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ग्रेट बॅकयार्ड बर्डकाऊंट अंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील पोथरा व लालनाला प्रकल्पावर अनेक प्रजातीच्या शेकडो पक्ष्यांची गणना करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या नोंदी ई. बर्ड या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्याची माहिती पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी दिली. या पाणवठ्यावर होत असलेली पक्ष्यांची गर्दी पाहण्याकरिता नागरिकांचीही गर्दी होत आहे. पोथरा व लालनाला प्रकल्प सध्या शेकडो पक्ष्यांनी गजबजून गेलेला आहे. स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतर करून आलेल्या अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा त्यात समावेश आहे. पाहुण्या पक्ष्यांमध्ये सामान्य क्रौंच, राजहंस, तलवार, बदक, चक्रांग, थापट्या, मोठी लालसरी, शेंडी बदक, भुवईबदक, चक्रवाक, तरंग बदक, काळ्या शेपटीचा मालगुजा, मोरशराटी यासह स्थानिक पक्ष्यांमध्ये हळदीकुंकू बदक, अडई, नकटा, वारकरी, नदीसुरय, आर्ली, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी चमचा शेकाट्या यासह अनेक प्रजातींचा समावेश आहे. या मांदीयाळीत इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन आॅफ नेचरने प्रसिद्ध केलेल्या रेड लिस्ट मधील पेंटेड स्टार्क, वुलीनेक्ड स्टार्क, ब्लॅक हेडेड आयबीस, ब्लॅक टेल्ड गॉडवीट, युरेशीयन कोरल व नदीसुरय या संकटग्रस्त प्रजातींचा समावेश आहे. हे पक्षी या प्रकल्प परीसरात आढळून आल्याने पक्षी अभ्यासक येथे आले आहे. याबाबत परिसरातील विद्यार्थ्यांना कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली. तसेच परीनिरीक्षणाची माहिती अभ्यासकांकडून देण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पोथरा व लालनाला प्रकल्पावर पक्ष्यांची मांदियाळी
By admin | Published: March 04, 2017 12:42 AM