लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वप्रथम वायफड वीज उपकेंद्र्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला.त्यांच्या या नियोजनांतर्गत घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अहोरात्र काम करीत तत्काळ सुरळीत केला. मात्र, अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी तातडीने सिमेंटच्या २५० खांबांची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरू करून ते त्वरित पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसात सर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.
७५० शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 9:18 PM
वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.
ठळक मुद्दे२५० वीजखांब पुन्हा उभारले : युद्धपातळीवर कामकाज