कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : ज्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली, त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संमेलनाला हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अचानक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. अभय बंग यांनी थेट ‘विद्रोही’चा सभामंडप गाठला. या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांना बघून आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांचाही यावेळी सूतमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तिकीट लागतेय बावा... संमेलनाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. वर्धेकरांचीही तोकडीच उपस्थिती दिसून येत आहे. वर्धेत स्वावलंबी मैदानावर दरवर्षी, लॉयन्स क्लबतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाला प्रवेशासाठी तिकीट आकारले जाते. त्यामुळे साहित्य संमेलनालाही तिकीट असल्याची धारणा वर्धेकरांची झाली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांची व श्रोत्यांची गर्दी संमेलनात दिसून आली नाही. शाळकरी मुलांना आणून संमेलनाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न आयोजकांना करावा लागला.
दुपारचे जेवण अन् परिसंवादात वामकुक्षी बहुतांश परिसंवादात श्रोत्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यातच दुपारच्या जेवणानंतर काहीजण आसनांवरच वामकुक्षी घेत असल्याचे चित्र दिसून आले. परिसंवादापूर्वी वक्त्यांचा परिचय आणि स्वागत एवढे लांबले की उपस्थितांपैकी अनेकांनी सभा मंडपाबाहेर जाणे पसंत केले. काही माध्यम प्रतिनिधी वगळता परिसंवाद ऐकणारे फार कमी होते. त्यामुळे वक्त्यांचा जोशही कमी दिसून आला.
भारुकाकांचे उपोषण विद्यार्थ्याची आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांना नवी प्रेरणा देण्यासाठी महेंद्र गौरीशंकर बैसाणे यांनी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने प्रयत्न करावे, यासाठी भारुकाकांची धडपड सुरू आहे. त्यांनी माजी संमेलनाध्यक्षांसह शासनाकडेही पाठपुरावा केला; पण त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी साडेचार महिन्यांपासून आत्मक्लेश सुरू केला आहे. संमेलनस्थळीच सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे.