पंकज वंजारे : ‘महिला आणि अंधश्रद्धा’ विषयावर व्याख्यानलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गर्भसंस्कार या नावाने मातेला मंत्र, दैवी कथा ऐकविण्याचे प्रकार सध्यास वाढीस लागले आहे. त्यामुळे बाळ जन्मानंतर हुशार होतो असा समज आहे. शब्द ऐकण्यासाठी म्हणजेच ध्वनिला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी हवेचे माध्यम गरजेचे असते. आईच्या गर्भात बाळ हवेत नाही तर गर्भजलात असते. त्यामुळे त्याला मंत्र, दैवी कथा ऐकू जाणे अशक्य आहे. अर्थात अशा कृती थोतांड असून त्यातून गर्भसंस्कार होणे अशक्य आहे, असे परखड मत अ.भा. अंनिसचे पदाधिकारी पंकज वंजारे यांनी व्यक्त केले. ‘महिला आणि अंधश्रद्धा’ विषयावरील आयोजित व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. गर्भसंस्कार केवळ गैरसमज पसरवितो. यापेक्षा मातेला सकस आहार आणि आनंदी वातावरण उपलब्ध करून देणे हाच खरा गर्भसंस्कार होय, असे ते पुढे म्हणाले. देहदानी रामभाऊ इंगोले यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मानव समाज विकसन संस्था, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा कुसूमबाई इंगोले परिवारातर्फे करण्यात आले होते. महिलांनी रूढी, परंपरा, उपास, व्रतवैकल्ये, अवास्तविक आणि गुंतवून ठेवणाऱ्या टीव्ही. मालिका इत्यादीचा त्याग करून स्त्री-पुरूष समानता, मानवतावादी आणि वैज्ञानिक दृष्टीकोण यांचा वापर करून सशक्त आणि समृद्ध राष्ट्राची पिढी निर्माण करावी, असे आकाहन केले. याप्रसंगी संजय इंगळे तिगावकर यांनी देहदान, अवयवदान यावर विचार व्यक्त केले. आत्मा, पुनर्जन्म, मोक्षप्राप्ती यासर्व भ्रामक कल्पना असून मृत्यूनंतर स्मशानात नाही तर मेडिकल कॉलेज मध्ये जा. आपल्या देहाचा वापर वैद्यकीय शिक्षणासाठी, प्रगतीसाठी करा, समस्त मानवजातीचे कल्याण करा, असा संदेश त्यांनी दिला.या कार्यक्रमात अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष सुचिता ठाकरे यांनी हातावर कापूर जाळणे व खाणे, अंगावरून जळता टेंभा फिरविणे, मंत्रशक्तीने होम पेटविणे, लिंबातून रक्त काढणे, तांब्याच्या गडव्यात भूत पकडणे, मंत्राने पाणी गोड करणे इत्यादी प्रयोगातील वैज्ञानिक सत्य स्पष्ट केले. यानंतर जिल्ह्यातील देहदान केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सत्कार केला. सत्कारमूर्तींना शाल, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व ‘गाडगेबाबा आले गावा’ पुस्तक देण्यात आले. यात ज्ञानेश्वर भोयर, वर्धा यांचे जावई शरद गावंडे, अॅड. श्रीरंग खडसे याचे पुत्र स्कर्मिश खडसे, प्रकाश चाफले यांचे नातलग डॉ. अशोक मांडुरकर, अर्चना काळे यांचे पती नंदकिशोर काळे, सुधा गोडे यांची मुलगी श्रेया गोडे, रामाजी कंकाल यांचे पुत्र लहुजी कंकाल, दीपक मुंजेवार यांची पत्नी, चेतना गुल्हाणे यांचे पुत्र प्रफुल्ल गुल्हाणे आणि राजेश गोडे यांची आई मालती गोडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्यदीप समाजभूषण पुरस्काराने प्रा. सूचिता ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देहदानाचा संकल्प करणारे अरूण ठाकरे व राजू वरके यांचा सत्कार करण्यात आला. स्मृतिदिनाप्रित्यर्थ बालसंस्कार, योगासन वर्ग डॉ. आशिष गुजर, निर्मला नंदुरकर यांनी घेतले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.
गर्भसंस्कारातून गर्भावर संस्कार अशक्य
By admin | Published: May 25, 2017 1:05 AM