सेवाग्राम (वर्धा) : १९३६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथूनच देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली. २ आॅक्टोंबरला १५० वी गांधी जयंती साजरी होत आहे. त्यासाठी सेवाग्राम येथे आश्रम परिसरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.या कार्यक्रमाला देश-विदेशातून अभ्यासक, पर्यटक येणार आहेत. राज्य शासनानेही गांधी जयंती जय्यत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथे बैठक घेवून या कामांचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी आश्रमातील सर्वकुटी सारविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रार्थनाभूमीच्या बाजूला डांबर लावणे, खराब झालेला बत्ता, बांबू बदलविण्याचे काम सुरू आहे. आश्रम परिसरात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानअंतर्गत यात्री निवास परिसरात प्राकृतिक आहार केंद्र नव्याने सुरू होत आहे. याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.
१५० व्या गांधी जयंतीची सेवाग्रामात जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:11 AM