वर्धा : माता भक्तांकरिता सर्वात महत्त्वाचा सण असलेला नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यात वर्धा शहर आणि हिंगणघाट येथे नवरात्रोत्सवाची विशेष धूम असते. संपूर्ण नऊ दिवस कार्यक्रमांची रेलचेल आणि भाविकांचा मेळा असतो. यामुळे वातावरण प्रसन्न होऊन जाते. वर्धा शहरात नवरात्रोत्सव अधिकाधिक चांगला, शांततेने आणि भक्तीभावाने साजरा करण्यासाठी यंदाही सर्वच दूर्गा उत्सव मंडळे सरसावले आहेत. देवीचे आसन, मंडळ, रोषणाई, मंडप यासह संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून माता भक्त मा दूर्गेच्या आगमनाकरिता आतूर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. एकेकाळी गणेशोत्सवाकरिता ज्याप्रमाणे पुलगाव प्रसिद्ध होते, तसेच वर्धा व हिंगणघाट ही शहरे नवरात्रोत्सवाकरिता ओळखली जातात. वर्धा शहरात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून दूर्गा उत्सव मंडळांकडून मातेची आराधना केली जाते. सध्या नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेवले असून मंगळवारी मातेच्या मूर्तीीची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण मंडळांनी जय्यत तयारी चालविली आहे. नवरात्रोत्सवामध्ये विविध देखावे, आकर्षक मंडप, रोषणाई केली जात असते. यासाठीही मंडळे सज्ज झाली असून रोषणाईच्या झगमगाटात शहर न्हाऊन निघणार आहे. शहरातील आर्वी नाका परिसरात भव्य मंदिराची उभारणी करून त्यात देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहेत तर अन्य ठिकाणीही सुंदर देखाव्यांसह गाभारे तयार करण्यात आले आहेत. सर्वत्र रोषणाई केली असून भाविकांकरिता अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे दूर्गा उत्सव मंडळांकडून सांगण्यात आले. शहरातील अनेक चौकांमध्ये उभारलेल्या भव्य कमाणी नागरिकांना दूर्गोत्सवाची चाहुल देत असल्याचे दिसते. शहरातील आकर्षक कमाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसते. एकूण आदिशक्तीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज व नतमस्तक झाले असून नवरात्रोत्सवाची जय्यज तयारी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरात नवरात्र उत्सव जय्यत तयारी
By admin | Published: October 11, 2015 12:25 AM