हनुमान टेकडीवर महाश्रमदानाचे तुफान : २५० नागरिकांकडून एकाच वेळी श्रमदान लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक हनुमान टेकडी परिसरात महावृक्षारोपण करण्याचा मानस वैद्यकीय जनजागृती मंचासह जिल्हाधिकारी तथा उपवन सरंक्षक कार्यालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला होता. या कार्याला आकार देण्याकरिता रविवारी सकाळी येथे महाश्रमदानाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला हात देत वर्धेतील तब्बल २५० नागरिकांनी स्वत: कुदळ, फावडे आणत, आपला सहभाग नोंदविला. या श्रमदानातून एका दिवसात केवळ तीन तासात एक हजार खड्डे खोदण्यात आले. सकाळी ६ वाजता पासून कुदळ-फावडे घेवून आबालवृद्ध हनुमान टेकडी परिसरात होणाऱ्या या महाश्रमदानात सहभागी झाले. वर्धेतील विविध सामाजिक संघटनानी या महाश्रमदानात कृतीशिल सहभाग देत आपल्या सामाजिक दायित्त्वाचा परिचय दिला. या महाश्रमदानात महिलांचा सहभाग सुद्धा उल्लेखनीय होता. त्यांनी टेकडी परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे कार्य केले. अनेक युवकांनी खड्डे खोदकामासह बंधारा घालण्यातही सहभाग दिला. या श्रमदान कार्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह वन विभागातील कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या श्रमदानात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: हातात कुदळ, फावडे घेत खड्डे केले. तर वर्धेचे उपवनसरंक्षक दिगंबर पगार देखील सहभागी झाले होते. वर्धा शहराला हिरवेगार करण्यात वर्धेकरांचा हा उत्साह अधोरेखित करणारा ठरला. रविवारी करण्यात आलेल्या महाश्रमातून तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांत आगामी १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपन करण्यात येणार आहे. या सर्व श्रमदानकर्त्यांना एक प्रकारे जबाबदारीची जाणीव निर्माण होईल तथा वृक्षारोपन सुद्धा उत्तम पद्धतीने होईल असा विश्वास वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे डॉ. सचिन पावडे यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतरचे महाश्रमदान येत्या रविवार (दि.४ जून) आयटीआय. टेकडीवर आयोजित करण्यात आले आहे. यातही नागरिकांकडून असाच सहभाग मिळेल असा विश्वास यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. या महाश्रमदानात हिंदी विश्व विद्यालय वर्धा, बहार नेचर फाउंडेशन, निसर्ग सेवा समिती वर्धा, आपले सरकार, आधारवड, श्रमिक पत्रकार संघ, जिल्हा परिषद सिंचन विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा येथील अधिकारी व कर्मचारीवृंद व इतर सामाजिक संघटनासह वधेतील संवेदनशील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वृक्षारोपणासाठी एका दिवसात १००० खड्डे तयार
By admin | Published: May 29, 2017 1:08 AM