सेवाग्राम (वर्धा) : देशात अहंकारी सरकार येण्यापूर्वी ७० वर्षांत भारतावर ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, २०१४ ते आजपर्यंत हे कर्ज १०० लाख कोटीने वाढून १५५ लाख कोटीपर्यंत गेले आहे. एकीकडे देशावर महागाईचे संकट, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी देशातील २८ राजकीय पक्षाने एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी आघाडी बनविली असून, या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्कुलुसीव अलायन्स) असे नाव दिले. ही आघाडी तयार होताच केंद्र सरकारने घाबरून देशाच्या नावाने इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, असे प्रयत्न सुरू केल्याची सडकून टीका आमदार रणजित कांबळे यांनी जाहीर सभेत केली.
राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा आष्टी शहीद येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती. मंगळवारी यात्रेचा समारोप सेवाग्राम येथील मेडिकल चौकात सायंकाळी झाला, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, माजी जि.प. अध्यक्ष पप्पू जयस्वाल, देवळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू, रमेश सावरकर, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, ग्रा.पं. सरपंच सुजाता ताकसांडे, बाळा जगताप, अमित गावंडे, पुरुषोत्तम टोणपे, धैर्यशील जगताप, मोरेश्वर खोडके, बाळ कुलकर्णी,बालू महाजन, धर्मपाल ताकसांडे आदी उपस्थित होते.