लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपती रामनाथ कोविद हे १७ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती २५ मिनिटे बापू कुटीत थांबणार आहेत. या दृष्टीकोनातून बापू कुटी व सेवाग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.नागपूर येथून राष्ट्रपती कोविद यांचे सकाळी १०.५५ वाजता सेवाग्राम येथील हॅलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ११ वाजता ते बापू कुटीत पोहोचणार आहे. ११. २५ वाजेपर्यंत ते बापूकुटीत थांबणार असून यावेळी ते बापू कुटी परिसरातील सर्व वास्तुंना भेट देणार आहे. राष्ट्रपती समावेत महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रपतींच्या पत्नी, मुलगा, मुलगी आदींचा समावेश राहणार आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून त्यांना प्रवेश दिला जाणार असून यावेळी आश्रमच्या प्रथेप्रमाणे पारंपारिक पद्धतीने आदी निवासाजवळ त्यांचे सूतमाळ, शाल व पुस्तक तसेच चरखा देवून स्वागत करण्यात येणार आहे. महादेवभाई देसाई कुटीच्या समोरील भागात राष्ट्रपतींच्या हस्ते चंदनाचे झाड लावले जाणार आहे. याच भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावले होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ही बकुळेचे झाड लावले आहे. त्यानंतर आता रामनाथ कोविद हे चंदनाचे झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती बापू कुटीतून महात्मा गांधी इंस्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स सेवाग्राम येथे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. याठिकाणी इंस्टिट्युटच्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रपती काय काय पाहतीलस्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रपती रामनाथ कोविद शनिवारी आदी निवास, बा कुटी, बापू कुटी या स्मारकाची पाहणी करून त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना होईल. महादेव कुटीत कपास ते कापड या उपक्रमाच्या चरखा, विनाई, कापड यांची पाहणी राष्ट्रपती करतील.