लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात साडेतीन दशकांपूर्वी शेतजमिनीला कवडीमोलच भाव मिळत होता. पण आता परिस्थिती बदलली असून, नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनींना कोटींच्या घरात भाव मिळत असल्याने अनेकांकडून ‘भाऊ वावर है तो पावर है’ असेच म्हटले जात आहे.साडेतीन दशकांपूर्वी कोरडवाहू शेती २० हजार रुपये एकर तर ओलिताची शेती ४० हजार रुपये एकरप्रमाणे मिळायची. तर आता जिल्ह्यातून महासमृद्धी, नागपूर - तुळजापूर हे महत्त्वाचे महामार्ग गेल्याने शिवाय सिंदी रेल्वे तसेच नागपूर जिल्ह्यातील गुमगाव येथे मिहान प्रकल्प आल्याने शेतजमिनीच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीला तिप्पट भाव देण्यात आल्यानेही शेतजमिनीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनीला सर्वाधिक भाव मिळत असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शेतजमिनींचे वेगवेगळ्या भावात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. मोठमोठाले लॅंड डेव्हलपर शेतजमिनींवर प्लॉट टाकत असल्याने सध्या महामार्गाशेजारी असलेल्या पडिक शेतीलाही चांगला भाव मिळत आहे. सर्वाधिक महागडी शेती वर्धा तालुक्याची असून, स्वस्त आष्टी तालुक्यात आहे. वर्धा-वायगाव मार्गावर शेती घ्यायची असल्यास एका एकरला ५० लाख रुपये मोजावे लागतात तर वर्धा-नागपूर मार्गावरील शेतीसाठी कोटींची रक्कमच मोजावी लागते. सरासरी जिल्ह्यात कोरडवाहू शेती ५ लाख रुपयांपासून ते ५० लाखापर्यंत आहेत, तर सिंचनाच्या शेतीचा २० लाखांपासून ते एक करोडपर्यंत भाव आहे. वर्धालगतच्या शेतीला विक्रीकर चौरस मीटरप्रमाणे आकारल्या जातो. यामुळे विक्रीचा खर्च अधिक येतो.
कोरडवाहूपेक्षा ओलिताच्या शेतीला चांगला भाव- जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास कोरडवाहू शेतीच्या तुलनेत ओलिताची सोय असलेल्या शेतीला चांगलाच भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
१५ वर्षांत वाढले शेतीचे भावनागपूर जिल्ह्यातील मिहान प्रकल्पामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतीचे अधिक प्रमाणात पैसे मिळाले. यामुळे तेथील शेतकरी वर्धा जिल्ह्यात शेती घेऊ लागले. तसेच ले-आऊटसाठी मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केली जात असल्याने १५ वर्षांपासून शेतीचे भाव वाढले आहेत. जिल्ह्यातून महामार्ग गेलेल्यानेही शेतीचे भाव वधारले आहे.
सर्वात जास्त भाव वर्धा तालुक्यातजिल्ह्याचे ठिकाण असल्याने वर्धा शहराशेजारील शेतीला जिल्ह्यातील इतर परिसराच्या तुलनेत जास्तच भाव मिळत आहे. विविध महामार्गांशेजारी ले-आऊटही टाकले जात असल्याने सर्वात जास्त भाव वर्धा तालुक्यातच असल्याचे दिसून येते.
शहराशेजारी असलेल्या पडिकचा ले-आऊटसाठी वापर...
वर्धा तालुक्यातील बऱ्याच भागात विविध प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय काही महामार्गही या तालुक्यातून गेले आहेत. शिवाय ले-आऊटसाठी शेतीची खरेदी केली जात असल्याने शेतीच्या भावात चांगलीच तेजी आली आहे.- गणेश चौधरी, शेतकरी, वर्धा
आष्टी तालुक्यात शेतीला पाहिजे तसा भाव मिळत नाही. येथे काही महत्त्वाकांशी प्रकल्पही नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती असून, ३ ते ४ लाख रुपये एकरप्रमाणे शेती खरेदी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या शेतीचा थाेडा चांगला भाव मिळतो.- श्रीधर ठाकरे, शेतकरी, आष्टी.