जखमीवर साडेतीन तासांनी उपचार : सेवेच्या नावाखाली कर्मचारी बेपत्ता आष्टी (शहीद) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी इसमाला उपचाराकरिता नेले असता केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेपत्ता असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिक चांगलेच संतापले. त्यांनी याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला दिल्यानंतर तब्बल साडेतीन तासांनी वैद्यकीय अधिकारी अवतरले. यावेळी नागरिक व वैद्यकीय अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक उडाली. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत थोडक्यात वृत्त असे की, साहूर येथील उमेश पांडे याच्यावर गावातील पंकज कुमरे व हरीश कुमरे या भावंडांनी डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रात्री ९ वाजता आणले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भंडारी ड्युटीच्या नावाखाली घरी होते. त्यांना जखमीसोबत आलेले प्रसाद वरकड यांनी घटनेची माहिती दिली असता त्यांनी येण्यास टाळाटाळ केली. तासभरानंतर त्यांना फोन केला असता त्यांनी जखमीला साहूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जा, असा सल्ला दिला. याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू भार्गव यांना कळताच येथे मोठी गर्दी जमली. याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्याेधन चव्हाण यांना दिली. त्यांनी प्रसंगावधान राखत शालेय तपासणी पथकाचे प्रमुख डॉ. आशिष निचत यांना तात्काळ जाऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या.डॉ. निचत यांनी लागलीच येवून उपचार सुरू केले. यामध्ये गंभीर जखमी उमेश पांडे याच्या डोक्याला टाके घातले. कुऱ्हाडीचा घाव ४ इंच लांब व २ इंच खोल एवढा मोठा असल्याने भरपूर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत जखमी उमेश कोमात गेल्याची अवस्था होती. तरीही वैद्यकीय अधिकारी उचारासाठी धजावले नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By admin | Published: June 25, 2016 2:05 AM