लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होण्यास विलंब होत असल्याने ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची मागणी केली होती. अखेर याची दखल घेऊन लवकरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिले आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागालाही लक्ष्य केले आहे. लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढतच आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही. रुग्णालयातही बेड फुल्ल झाले असून, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याची मागणी जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे यांनी ना. नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. आता ना. गडकरी यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यासाठी हिरवी झेंडी दिल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणे उपलब्ध होणार असून, प्राधान्यक्रमाने प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरविले जाईल, असे जि. प. अध्यक्ष गाखरे यांनी सांगितले.