लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यासह मोठ्या तालुक्याच्या स्थळी कोविड बाधितांवर उपचार केले जात आहेत. पण, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तसेच दूरच्या भागातही प्राथमिक व्यवस्था उभी झाली पाहिजे, अशी मागणी आपल्याकडे स्थानिक आमदारांनी केली आहे. त्यांची ही मागणी रास्त असून त्यावर जिल्हा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ती निकाली काढली पाहिजे. इतकेच नव्हे तर भविष्यातील गरज लक्षात घेता व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज असून त्यावरही भरीव काम व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या दालनात वर्धा जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मिलिंद भेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस आदींची उपस्थिती होती.फडणवीस पुढे म्हणाले, वर्धा जिल्ह्याने ऑक्सिजन प्लॅन्टची मागणी नोंदविली आहे. भविष्यातील लिक्विड ऑक्सिजनची गरज आणि मागणी लक्षात घेता ऑक्सिजन प्लॅन्टचा विषय कसा लवकरात लवकर मार्गी लागेल, यावर विचार झाला पाहिजे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच्या तुलनेत आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ अपुरे आहे. पण, याही संकटावर कशी मात करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात आभासी जगात जगणे योग्य हाेणार नाही. रुग्ण कमी झाले तर आनंद आहे; पण राज्यात दररोज ६५ हजारांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. नागपूर, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांत संसर्गाचा रेशो १५ टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढविले गेले पाहिजे, असे स्पष्ट केले.
या विषयी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूविशेष प्रयत्न झाल्यास महिला रुग्णालयाच्या इमारतीचे वेळीच काम पूर्ण करून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच व्हेंटिलेटर, आयसीयू सेवा असलेले २०० बेडचे कोविड युनिट सुरू होऊ शकते. पण, सध्या काही इमारती अधिग्रहित करून वर्धा शहराशेजारी जम्बो कोविड हॉस्पिटल उभे करण्याचा प्रयत्न होत आहे, असा प्रश्न लोकमतच्या प्रतिनिधीने विचारला असता ‘या विषयी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रुग्णालयात १५ तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात १६ मिनिटे चर्चाविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत १५ मिनिटे, तर जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत १६ मिनिटे चर्चा केली. या चर्चेदरम्यान विविध विषयांवर माहिती जाणून घेत काही सूचनाही करण्यात आल्या.