रवींद्र चांदेकर / प्रदीप भाकरे, लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/अमरावती : २०१४ पूर्वी देशात अनेक सिंचन प्रकल्प अडकून पडले. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या प्रकल्पांना आम्ही निधी दिला. त्यामुळे त्यांना पुनरुज्जीवन मिळाले. ‘बारशाला गेला अन् बाराव्याला आला,’ अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. काँग्रेसने अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची केली होती, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोडले.
वर्धा व अमरावती मतदारसंघासाठी प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वर्धाचे भाजप उमेदवार रामदास तडस, अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ज्यांची काँग्रेसच्या काळात विचारपूसही केली नव्हती त्याच गोरगरीब, शेतकरी, मजुराला या गरिबाच्या सुपुत्राला साक्षात पुजले आहे. या वर्गाचा विकास हाच आमच्या केंद्रस्थानी आहे. दहा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्याची किमया आम्ही करून दाखविली.
पाइपलाइनद्वारे गॅस किचनपर्यंत प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांना वयानुसार विविध आजारांना सामाेरे जावे लागते. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतची काळजी म्हणून ७० वर्षांवरील ज्येष्ठांना पाच लाखांपर्यंत आरोग्य मोफत उपचार मिळेल, तसेच प्रत्येक घरातील किचनपर्यंत पाइपलाइनने गॅस पाेहोचविला जाईल, अशी ग्वाही मोदींनी दिली.
३२ मिनिटे ५९ सेकंदांचे भाषणपंतप्रधान मोदी यांनी आपल्या ३२ मिनिटे ५९ सेकंदांच्या भाषणात ‘इंडिया आघाडी’ हा शब्द टाळला. प्रत्येक वेळी ते ‘इंडी’ आघाडी असाच उल्लेख करत होते. आपण यापूर्वीदेखील वर्धेला प्रचारासाठी आलो. मात्र, यंदा उसळलेल्या गर्दीने मागील सभेचा रेकॉर्ड मोडल्याचेही त्यांनी नमूद केले.