वर्धा : शिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केल्याची घटना येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बैरेक क्रमांक ८ मध्ये १५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या थराराने कारागृहातील इतर कैद्यांस कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कपिल नंदकिशोर आखाडे (२६) रा. मारोती वॉर्ड हिंगणघाट असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे.
कपिल आखाडे आणि शेख तौफीक हे दोघेही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बैरेक क्रमांक ८ मध्ये स्थानबद्ध आहे. १४ रोजी बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शिक्षाधीन बंदी शेख तौफीक हा कपिल आखाडे याच्या बिछाण्यावर बसून होता. दरम्यान तेथून कपिल आखाडे जात असताना त्याचा धक्का शेख तौफिकला लागला. या कारणातून दोन्ही बंदीवानांमध्ये चांगलाचा वाद झाला होता.
१५ रोजी गुरुवारी कपिल आखाडे हा बैरेकमध्ये असताना शिक्षाधीन बंदी शेख तौफीक याने एक दिवसापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका दुपट्ट्यात छोटे छोटे दगडं बांधून त्याची पोटली तयार करुन कपिल आखाडेवर अचानक हल्ला चढविला. या घटनेने कारागृहातील इतर बंदीवानांसह कारागृह प्रशासनांत चांगलीच खळबळ उडाली.
याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. शहर पोलिसांनी शिक्षाधीन बंदीवान शेख तौफीक याच्याविरुद्ध मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत असल्याची माहिती दिली.शेख तौफीकला कारागृहाबाहेर सुटण्यास केवळ महिना बाकी
शेख तौकी शेख शाकीर याच्यावर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याने तो शिक्षा भोगत आहे. त्याची शिक्षा संपून कारागृहाबाहेर येण्यासाठी केवळ महिनाभर वेळ आहे. मात्र, कारागृहातच त्याने इतर बंदीवानावर हल्ला केल्यामुळे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.न्यायदीन बंदीवानाला पडले तीन टाके
न्यायधीन बंदीवान कपिल आखाडे याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते. कारागृहात असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केला. त्याला तीन टाके पडल्याची माहिती आहे.