श्याम मानव : कृषीआधारित अर्थव्यवस्था व ‘स्वामिनाथन’ हाच पर्यायवर्धा : वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत. या मोर्च्यांचे मानसशास्त्र जर सरकारने वेळीच ओळखले नाही तर येणारा काळ हा तीव्र संघर्षाचा असेल. असंतोषाच्या ज्वालामूखीचा भविष्यकाळात आकस्मिक विस्फोट होऊ नये, यासाठी कृषिआधारित व्यवस्था निर्माण करणे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, हाच पर्याय असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.‘मराठा क्रांती मूक मोर्चामागील असंतोषाची मूळ कारणे’ या विषयावर घेण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या विषयावर प्रथमच आयोजित व्याख्यानात प्रा. मानव यांनी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडली. मंचावर प्रा. शेख हाशम, प्रा. जनार्दन देवतळे, अॅड. के.पी. लोहवे, अ.भा. अंनिसचे राज्य संघटक अॅड. गणेश हलकारे, महिला आघाडी प्रमुख छाया सावरकर, राज्यसचिव प्रशांत सपाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, संघटक पंकज वंजारे यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे भविष्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सहसंबंधावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करताना प्रा. मानव म्हणाले, मराठा, जाट, पटेल, गुज्जर, माळी या सर्व शेतीवर निर्भर असणाऱ्या जातीच्या मोर्चामागील अस्वस्थता शेती संस्कृतीतील समस्यांमुळे उद्भवली. यापूर्वी जगभर निघालेले मोर्चे पाहता अत्यंत कमी कालावधीत ठराविक नेतृत्वाशिवायही लक्षावधी लोक एकत्र येतात, यामागची मानसिक अस्वस्थता नीट ओळखली पाहिजे. मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे अनेक मागण्या पुढे आल्या अस्ल्याचे सांगितले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतीसमोरील समस्याच सर्व असंतोषाच्या मुळाशी
By admin | Published: November 12, 2016 1:13 AM