जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : खासदारांची उपस्थिती; विविध विषयांवर चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : निम्म वर्धा प्रकल्प ग्रस्तांची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. माजी आमदार दादाराव केचे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित प्रकल्पग्रस्तांच्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रकल्प ग्रस्तांच्या विविध समस्या त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्वस्त केले. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना १० लाख रुपये मुद्रा योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत देण्याचे निर्देश अग्रणी बॅकेच्या अधिकार्ऱ्यांना दिले. घराचे सातबारा, भुस्वामी हक्काने १ आॅगस्ट पर्यंत घरपोच मिळतील. भूखंड विक्री परवानगी प्रकरणे, भूखंड अदलाबदलीचे प्रकरणे निकाली काढण्यात यावे, असे निर्देश दिले. १८ नागरी सुविधांची कामे ग्रामपंचायत मार्फतच होतील याबाबत आश्वस्त करून शेती वहिवाटीचे पांदण रस्ते तात्काळ पूर्ण करावे असे निर्देश दिले. अल्लीपूर येथील सर्वच प्रकल्प ग्रस्तांना घरकुल बांधून देण्यात येईल. देऊरवाडा येथील बॅक वॉटरमुळे नदी काठची घरी क्षतिग्रस्त होण्याची शक्यता असल्याने सर्व्हे करून उपाय करण्यासाठी सांगितले. पुनर्वसन येथील पाणी क्षारयुक्त असल्याने शुद्धीकरणाची यंत्रणा उभारली जाणार असून चर्चेतील विषय तत्काळ मार्गी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला सर्कसपूर निंबोली, ईठलापूर, भाईपूर, पिपरी, वाठोडा, अहिरवाडा, अंबिकापूर, राजापूर, बोरगाव, भादोड, सालोड, नेरी मिझार्पुर, हैबतपूर, अंतरडोह, वाढोणा येथील प्रकल्पग्रस्त व अधिकारी उपस्थित होते.
निम्म वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी
By admin | Published: July 12, 2017 2:01 AM