तालुक्याचा दर्जाही नाही : रस्त्यावर येणारी मंडळी गटबाजीत व्यस्तपुलगाव : शहरातील मोठा उद्योग बंद झाला, हजारो कामगारांच्या हाताला काम नाही. या वस्त्रोद्योगाचे पुनर्निर्माण झाले; पण अत्यल्प कामगारांना काम मिळाले. कामगार हितासाठी रस्त्यावर उतरणारी मंडळी कागदोपत्री घोडे दौडवित आहे. काँग्रेस, भाजप, बसपा, शिवसेना आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामान्यांच्या समस्यांवर रस्त्यावर येत होते. शेतकरी आत्महत्या करीत आहे. अतिक्रमणामुळे बेरोजगारांचे रोजगार गेले. वाढत्या महागाईमुळे सामान्य त्रस्त आहे; पण या समस्यांसाठी रस्त्यावर येणारी मंडळी सत्तेच्या दालनात गटबाजीत व्यस्त असल्याचे दिसते. ६६ वर्षे काँग्रेसची या देशावर सत्ता होती; पण या काळात काँग्रेसने विकास केला नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या होत आहे. जीवनावश्यक वस्तूचे वाढते भाव, भरमसाठ वीज बिल, वाढते अतिक्रमण आदी समस्यांसाठी रस्त्यावर येऊन सत्तारूढ पक्षाविरूद्ध आंदोलन करणारी मंडळी आज केंद्र, राज्यासह जिल्हा परिषद, नगर परिषदेत सत्तेत आहे. शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, पाणी समस्या आदींसाठी भाजपा कार्यकर्ते न.प. मध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसविरूद्ध आंदोलन करीत होते; पण आता तेच या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. नगर परिषदेने अतिक्रमण पाडले. अतिक्रमणग्रस्तांना न.प. प्रशासनाने घरे बांधून द्यावी या मागणीसाठी बसपाने मोठे आंदोलन केले. सेनेनेही विविध समस्यांसाठी आंदोलने केली. आज न.प. मध्ये भाजपा, अपक्ष सत्तेत आहे. काँग्रेस बसपाची आघाडी आहे; पण कुणी आंदोलन करताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये माजी नगराध्यक्ष मनीष साहू व गटनेता राजण चौधरी, असे दोन गट तर भाजपाचे शहराध्यक्ष मंगेश झाडे, संजय गाते व जिल्हा चिटणीस नितीन बडगे यांच्यातील गटबाजी रामनवमीच्या कार्यक्रमातून चव्हाट्यावर आली. कित्येक वर्षानंतर बसपाला न.प. निवडणुकीत पाच जागा मिळाल्या; पण त्यांच्यात राजेश लोहकरे व कुंदन जांभुळकर, असे गटबाजीचे राजकारण सुरू झाले. पूर्वी न.प. मध्ये शिवसेनेच्या एक-दोन जागा राहत होत्या; पण आज तिथेही माजी जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर मोहोड, नरेशसिंह ठाकूर व तालुका प्रमुख आशिष पांडे, असे गट पडले. गटबाजीमुळे १० जागांहून काँग्रेस दोनवर तर सेना शून्यावर आली. बसपाला पाच जागा मिळाल्या खऱ्या; पण तिथेही गटबाजी सुरू असल्याने सामान्यांच्या समस्यांबाबत कुणाला आस्था नसल्याचेच दिसते.(तालुका प्रतिनिधी)
सत्ता बदलानंतरही शहरातील समस्या ‘जैसे थे’
By admin | Published: April 07, 2017 2:07 AM