आॅनलाईन लोकमतआष्टी (श.) : जि.प. सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांबाबत आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य केले. यामुळे तालुक्यातील शिक्षकांत असंतोष आहे. या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत प्राथमिक शिक्षकांनी गटविकास अधिकारी मरभड यांच्यामार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोमवारी निवेदन सादर केले.२०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी नवीन विद्यार्थी प्रवेश, दाखलपात्र व दाखल विद्यार्थ्यांचे दोन तास जादा वर्गाचे आयोजन, शिक्षण सभापतींच्या पुढकाराने राबविण्यात येत असलेल्या प्रेरणा उपक्रमाच्या कार्यशाळेचे आयोजन जि.प. पदाधिकारी, सदस्य, केंद्रप्रमुख व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले होते. या सभेला शिक्षणाधिकारी (प्राथ.) व्ही.पी. कानवडे हे प्रमुख मार्गदर्शक होते. मार्गदर्शनपर भाषणात त्यांची जीभ शिक्षकांवर घसरली. त्यांनी ‘शिक्षकांना समाजात कोणतेही स्थान नाही, आदर नाही, अभियंत्यांची जी प्रतिमा, आदर आहे, तो शिक्षकांना नाही, मागणे होत नसेल भिक तर मास्तरकी शिक’, असे उपहास व अपमान करणारे दुर्दैवी विधान केले. या अपमानजनक वक्तव्यामुळे संतप्त शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. शिक्षण समिती सदस्य धनंजय केचे, अनिल ठाकरे यांच्या नेतृत्वात शिक्षकांनी निषेधाचे पत्र देत पं.स. सभागृहासमारे धरणे दिले. यावेळी रणजीत झामडे, सचिन नागपुरे, मदन करनाहके, प्रकाश परतेती, कल्पना कपले, सविता कोकाटे, सीमा लाटकर, माया सावरकर, विलास काळे, माहुरे, गाडगे, प्रमोद केचे, पद्मा महल्ले, सुरेख सोनटक्के, नंदा येसनखेडे, जयश्री तायडे आदी शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा शिक्षकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:26 PM
जि.प. सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांबाबत आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य केले.
ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांना निवेदन