चैतन्य जाेशी
वर्धा : गांधी-विनोबांची कर्मभूमी असलेल्या जिल्ह्याची देशात सर्वत्र ओळख आहे. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. मात्र, याच जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलालढाल होते, हे देखील सर्वांनाच माहिती आहे. अशातच पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारूविक्रीविरोधात मैदानात उतरले अन् महिनाभरातच ‘रिझल्ट’ देत तब्बल ७७५ दारू विक्रेत्यांवर कारवाईचा दंडुका उगारून १ कोटी १७ लाख ५८ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला.
जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून, तब्बल ४८ वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदावरच अन् आठवणीतच राहिली. आजघडीला कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल याच वर्धा जिल्ह्यात होत असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे, तर दारूविक्रेते गब्बर बनत चालले आहेत. असे असतानाच जिल्ह्याचा कार्यभार पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्वीकारातच नागरिकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. पोलिस अधीक्षक हसन यांनी येताच अवैध दारू विक्रेत्यांवर दंडुका उगारणे सुरू केले आहे. महिनाभराचा लेखाजोखा त्यांनी दिला असता तब्बल १ कोटी १७ लाखांवर मद्यसाठा जप्त करून ७२२ प्रकरणे पोलिस दप्तरी दाखल करून ७७५ दारूविक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या धडक कारवाईने जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांना ‘सळो की पळो’ करून लावले असून, अनेकांनी शहरातून पलायनही केल्याचे दिसून येत आहे.
विषारी हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
जिल्ह्यात २५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारूअड्ड्यांवर छापा टाकून अवैध विषारी दारू गाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ५ प्रकरणं दाखल करून १ लाख ७४ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ६ दारूविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून हातभट्ट्या उद्धवस्त केल्या.
...............