वर्धा: एखाद्या व्यक्तीची लैंगिक अभिमुखता (सेक्शुअल ओरिएंटेशन) बदलून ती विषमलैंगिक करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या रुपांतरण उपचार (कन्वर्जन थेरेपी) पद्धतीवर बंदी आणण्यात आली आहे. जर कुठला वैद्यकीय व्यावसायिक असे करत असेल तर ते भारतीय वैद्यकीय परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नीतिशास्त्र) नियमन-२००२ नुसार अनैतिक आचरण आणि व्यावसायिक गैरवर्तन ठरेल असे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात सादर केले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमातील LGBTQIA (लेस्बियन-स्त्रीसमलिंगी, गे-पुरुष समलिंगी, बायसेक्शुअल-उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, अलैंगिक इत्यादी) समुदायासंबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने न्यायालयासमोर असे प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीमध्ये डॉ. वीजेंद्र कुमार (दिल्ली), डॉ. प्रभा चंद्रा (सायकिर्टी विभाग- बंगलोर), डॉ. सुरेखा किशोर (एम्स- गोरखपुर) व डॉ. इंद्रजीत खांडेकर (सेवाग्राम) हे तज्ज्ञ होते. भिन्नलिंगी नसलेल्या अभिमुखतेसह विविध प्रकारच्या लैंगिक अभिमुखता सामान्य आहेत आणि एखाद्या व्यक्तीची लैंगिक प्रवृत्ती बदलून भिन्नलिंगीकडे नेण्यासाठी कोणताही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे, असेही मत समितीने मांडले.
काय आहे कन्वर्जन थेरपी
कन्वर्जन थेरपीमध्ये मानसोपचार, औषधोपचार (अँटी-सायकोटिक्स, अँटी-डिप्रेसंट्स, अँटी-अँझायटी आणि सायकोएक्टिव्ह ड्रग्स आणि हार्मोन इंजेक्शन्सचा) तसेच इलेक्ट्रोशॉक किंवा इलेक्ट्रोकॉनव्हल्सिव्ह थेरपी इत्यादीचा समावेश होतो.
कन्वर्जन थेरेपीचा उद्देश एखाद्या व्यक्तीची लैंगिक अभिमुखता बदलणे हा असतो. एखाद्या व्यक्तीची लैंगिक प्रवृत्ती बदलली जाऊ शकते. या चुकीच्या आणि अवैज्ञानिक समजुतीवर ही उपचार पद्धती केली जात होती. तसेच ही उपचार पद्धती ‘लैंगिक अभिमुखतेच्या निराधार गैरसमजावर’आधारित आहे.
डॉ. इंद्रजीत खांडेकर, प्राध्यापक, न्यायवैद्यक शास्त्र विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.