पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. या प्रकल्पाला मूर्त रूप देण्याचे काम सुरू असले असले तरी अद्याप अर्धवटच आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, असा प्राथमिक अंदाज होता. ३१ गेट असलेल्या हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्प कधी पूर्णत्वास जाणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.धनोडी (बहाद्दरपूर) येथे १ जानेवारी १९८१ रोजी निम्न वर्धा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ३६ हजार ३३५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या ४८.०८ कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या या प्रकल्पाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. पण, तो २०१८ पर्यंतही पूर्ण होऊ शकला नाही. एकंदरीत निम्न वर्धा प्रकल्प शासकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकला आहे. विहीत मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली.बांधकाम साहित्याच्या किमती वधारल्याने आजपर्यंत तीनवेळा वाढीव सुधारीत दराने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पाची किंमत २,३६५.०८ कोटी रुपये झाली आहे. या निधीलाही शासनाने १८ आॅगस्ट २००९ रोजी मंजुरी दिली. निम्न वर्धा प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील ४६ गावे व अमरावती जिल्ह्यातील १७ गावे वंचित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे १६ हजार ५६६ व्यक्ती प्रभावीत झाल्या. ६३ बाधीत गावांपैकी २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. ही कामे ९५ टक्केच पूर्ण झालीत. उर्वरित गावांना अद्याप मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांत असंतोष आहे.निम्न वर्धा प्रकल्पाच्या निर्मितीप्रसंगी ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन शक्य असल्याचे सांगण्यात आले होते. पण, २६ वर्षांचा कालावधी लोटला असताना प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. मुख्य कालव्याचे खोदकाम करण्यात आले, ते अपूर्णच आहे. काही ठिकाणी सिमेंटीकरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी केवळ खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. या कालव्यात बुडून पुलगाव, नाचणगाव परिसरातील अनेक युवकांचा मृत्यू झाला. पण, कालव्याचे काम पुढे सरकले नाही. आजही पुलगाव येथे कालवा खोदकाम केलेल्या स्थितीतच आहे. यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली जात असली तरी कृती मात्र नाही.
धरण परिक्षेत्रात अतिरिक्त जमीन पडित आहे. या जमिनीवर पर्यटनस्थळ तयार केल्यास या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.सुधीर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी.