समुद्रपूर : जिल्ह्याच्या पर्यटन विकास व पर्यटन स्थळावर आवश्यक सुविधा निर्माण करणे, वाढविणे यासाठी महोत्सवांच्या माध्यमातून विकासाला चालना देणार, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.विद्या विकास महा. च्या प्रांगणात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय जिल्हा पर्यटन महोत्सव सुरू आहे. उद्घाटन खा. तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समीर कुणावार, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, किशोर दिघे, उमेश तुळसकर, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेटे, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, तहसीलदार सचिन यादव उपस्थित होते. वर्धा हा पर्यटन समृद्ध जिल्हा आहे. सेवाग्राम, पवनार आश्रम हा जागतिक पर्यटनाचा वारसा लाभलेला असून ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे. या अस्मितेबरोबरच इतरही महत्तम अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटकांच्या आकर्षणासाठी विविध पर्यटन, धार्मिक स्थळे आहे. पर्यटन संवर्धन व रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सेवाग्राम विकास आराखडाही पर्यटनाचाच एक भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.पर्यटन विकासास कटीबद्ध आहे. आजनसरा, शहालंगडी, कापसी, गिरड आदी पर्यटन, धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करणार, असे आ. कुणावार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी केले. संचालन किरण वैद्य यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी भुगावकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
पर्यटन विकासाला चालना देणार
By admin | Published: June 03, 2015 2:19 AM