वर्धा : शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख व सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री आर्वी येथील डॉ. पावडे नर्सिंग होम व त्यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध जिल्हा शाखांद्वारे ठिकठिकाणी संबंधितांना निवेदन दिली. वर्धेतील आयएमए शाखेद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आर्वी येथील पावडे नर्सिंग होम येथे एक महिला उपचारार्थ दाखल झाली. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून खुद्द डॉ. पावडे यांनीच पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली; पण घटनेशी काडीमात्र संबंध नसताना शिवसेना जिल्हाप्रमुख देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह डॉ. पावडे यांच्या रुग्णालय तसेच घरावर हल्ला करून साहित्याची नासधूस केली. सोबतच प्रक्षोभक भाषणे देत डॉ. पावडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे देशमुख यांच्यावर त्वरित फौजदारी कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली. इतकेच नव्हे तर संघटनेच्या अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, बारामती, रामटेक, हिंगणघाट आदी शाखांद्वारेही स्थानिक प्रशासनाला निवेदने दिली.(शहर प्रतिनिधी)
आर्वीतील ‘त्या’ हल्ल्याचा सर्वत्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2016 2:09 AM