जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून काम : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : जिल्ह्यासह राज्यातील जि. प. मधील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सावत्रपणाची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप करीत प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून काळी फित लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशीष दहिवडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी १४ मार्चपर्यंत योग्य पावले न उचलल्यास १५ मार्च पासून लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. गत २७ वर्षांपासून न्याय मागण्यासाठी न्यायालयालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला आहे. त्यानंतर शासकीय स्तरावर मागण्या निकाली निघाव्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने पाठविलीत. परंतु, अद्यापही मागण्या निकाली काढण्यात आलेल्या नाहीत. जि. प. मध्ये काम करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांनी याचा निषेध म्हणून १० मार्चपासून काळी फित लावून काम करण्यास सुरूवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागण्या निकाली काढण्यासाठी १४ मार्च पर्यंत योग्य पावले उचलावित अन्यथा १५ मार्चपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. शुक्रवारी निषेध आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
लेखा कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
By admin | Published: March 11, 2017 12:40 AM