वर्धा- ओखी चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोकणतील शेती व फळबागांचे नुकसान झाले आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे पश्चिम, मध्य व उत्तर महाराष्ट्रात अनेक भागातील शेती पिके, फळबागा, भाजीपाला यावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामाचे सर्वेक्षण, पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूप नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.राज्याला ओखी चक्रीवादळचा धोका असल्याबाबतचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ४ व ५ डिसेंबर रोजी ओखी चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मध्य व उत्तर महाराष्ट्रात मोठा प्रभाव निर्माण केला. किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात पर्जन्यवृष्टी झाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका पिकांना होणार आहे. त्यामुळे सरकारने लगेचच सर्वेक्षण सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मुंडे केली आहे.आगामी काळात यामुळे वातावरण बदलातून रोगराई पसरून शेती पिकांचे नुकसान होईल, अशी भीती पत्रात व्यक्त केली असून, यामुळे शेतक-यांच्या समस्येत भर पडणार असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
ओखी चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 5:08 PM