वर्धा : सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजार डोके वर काढत आहे. शिवाय जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला. डेंग्यूचेही रुग्ण आढळत आहेत. याबाबत वैद्यकीय जनजागृती मंचाकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून विविध शाळेत उपक्रम राबवित आहे. यात सोमवारी सकाळी ६.३० वाजता न्यू इंग्लिश हायस्कूल येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय व्यास होते तर अतिथी म्हणून डॉ. संजय गाठे, सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचाचा उद्देश व लक्ष्य डॉ. सचिन पावडे यांनी विषद केले. स्वाईन फ्ल्यू व डेंग्यू आजाराची लक्षणे याबाबत डॉ. शंतनू चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रतिबंधात्मक उपायांबाबत डॉ. राजेश सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रतिबंधात्मक उपायांबाबत शपथ दिली. याप्रसंगी प्राचार्य व्यास यांनी स्वाईन फ्ल्यू या आजाराला आळा घालण्यासाठी आजारी विद्यार्थ्यांना परवानगीने अनुपस्थित राहण्याची मुभा देण्यात येईल, हात स्वच्छ धुण्याकरिता शाळेकडून संपूर्ण विद्यार्थ्यांना साबण पुरविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व जनजागृती मंचातील डॉक्टर उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
स्वाईन फ्ल्यू व डेंग्यूबाबत जनजागृती
By admin | Published: September 15, 2015 4:47 AM