वर्धा : डेंग्यू व इतर किटकजन्य आजारांबाबत हिवताप, जे.ई., चिकुनगुनिया, चंडीपुरा व हत्तीरोग आदी आजारांची जनतेमध्ये जागृती निर्माण होत प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. यासाठी प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जुलै हा डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा केला जातो. या जनजागरण मोहिमेत गावपातळीवर जनजागृती केली जाते.डेंग्यू तापाची लक्षणे, उपचार व डेंग्यू प्रतिरोधाच्या विविध उपाययोजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती प्रतिरोध उपाययोजनेत लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या आजारांच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी व लोकसंख्येतील विषाणूभार कमी करण्यासाठी उपचार तसेच डासोत्पती स्थांनाची निर्मिती होऊ न देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच ग्रामीण भागात या आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून किटकजन्य आजार डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै राबविण्यात येत आहे. आरोग्याबाबत योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. रुग्ण शोध मोहीम तसेच डांसावर नियंत्रणासाठी जनतेच्या सहभागाला महत्त्व आहे. यामुळे जनतेने सामाजिक बांधिलकी समजून किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य केल्यास डासांपासून प्रसार होणाऱ्या आजारांवर नियंत्रण होऊन जनतेला चांगल्या आरोग्याचा लाभ मिळू शकतो. जनजागृती ही केवळ शासनाची जबाबदारी नसून जनतेने या कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य सहकार्य करावे. किटकजन्य आजार प्रतिरोध मोहीम ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व कार्यक्षेत्रातील उपकेंद्र व गावपातळीपर्यंत राबविण्यात येणार आहे. यात सर्व गावांत ग्रामसभा घेत जनतेला किटकजन्य आजाराचा प्रसार, लक्षणे, उपचार उपलब्धता किटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर, शोषखड्ड्याची निर्मिती, व्हेंट पाईपला जाळ्या बसविणे, जनतेने करावयाच्या उपाययोजना याबाबत दवंडी, दिंड्या व गटसभांच्या माध्यमाने म्हणीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
कीटकजन्य आजार, डेंग्यू प्रतिरोधासाठी जनजागृती उपक्रम
By admin | Published: July 03, 2016 2:09 AM