स्टेट बँक कॉलनी : चिखलातून नागरिकांना करावे लागते मार्गक्रमण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : धुनिवालेबाबा मंदिर परिसराजवळ असलेल्या खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात पावसाळ्यात रस्त्याची समस्या बिकट झाली आहे. या परिसरातील नागरिक रस्ता समस्येमुळे त्रस्त झाले असून या भागातील अनेक ठिकाणी खा. तडस यांनी रस्ते काँक्रीटीकरणासाठी निधी दिला. परंतु कंत्राटदार काँक्रीटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने करीत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातून पादचाऱ्यांना पायी चालणे ही कठीण झाले आहे. पहिल्याच पावसात वाहने घसरून या भागात अनेकांना अपघात झाला आहे. शाळकरी मुलांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. न्यू स्टेट बँक कॉलनीत नवनागे ले-आऊटच्या मागील भागातील परिसरात ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात न्यू आर्टस् कॉलेजचेही विद्यार्थी राहतात. त्यांना ही महाविद्यालयात जाताना अडचण येत आहे. खासदार रामदास तडस यांनी न्यू स्टेट बँक कॉलनीतील नागरिकांची ही समस्या त्वरित सोडण्यासाठी रस्ता काँक्रिटीकरण्याचे काम त्वरित करावे अशी मागणी अॅड. देशमुख, डवले केळवतकर, वाघमारे, लाडे, खोडे आदी नागरिकांनी केली आहे. शिवार्पण नगरातील रस्त्यांची दुरवस्था नालवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तिवारी ले-आऊट शिवार्पण नगर भागातील रस्त्याची पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली आहे. नालवाडी येथून म्हसाळा गावाला जोडणारा हा रस्ता शिवार्पण नगरातून जातो. या भागात राहणाऱ्या नागरिकांना सध्या चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. नालवाडी गावाचा हा विस्तारीत भाग असून या भागात अनेक ठिकाणी नाल्या बांधकाम करण्यात आलेले नाही. तसेच रस्त्याचे खडीकरण पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून खासगी कंत्राटदारांची जड वाहने मोठ्या संख्येने जात असल्याने पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खासदार रामदास तडस यांच्या निधीतून या रस्त्याच्या काँक्रीटीकरण/डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर मात्र हे काम अजूनही सुरू झालेले नाही. खासदार तडस यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवार्पण नगरातील नागरिकांनी केली आहे.
खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा परिसर समस्याग्रस्त
By admin | Published: June 29, 2017 12:37 AM