ग्रामीण रुग्णालयांत गर्दी : दररोज २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांत पुलगाव : श्रावणधारा बरसत असून उन्ह पावसाच्या खेळामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी गॅस्ट्रो, डायरियासह कीटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सोबतच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी व संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी पुलगावकर बेजार झाले आहे. तालुक्यातील पुलगाव शहरासह देवळी, भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. देवळी, गौळ, नाचणगाव, गिरोली, विजयगोपाल या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या २५० ते ३०० वर गेली आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनाही सुगीचे दिवस आले आहे. देवळी तालुक्यात चांगला पाऊस बरसल्याने बळीराजा आनंदला आहे. परंतु कधी कडक उन्ह तर कधी ढगाळ वातावरण यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. गत पंधरा दिवसांपासून व्हायरल फिवरची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालये ४ ते ५.३० पर्यंत असली तरी सकाळपासून दुपारपर्यंत आरोग्य केंद्रात रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात. आय.पी.एच.एस. दर्जाच्या तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. तशी तरतूदही असल्याचे समजते. तरीही नाचणगाव सारख्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी २० गावातील ३३ हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहे. डॉक्टराच्या रिक्त पदांच्या अनुशेषामुळे इतर आरोग्य केंद्रातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात अतिसार, सर्दी, अंगदुखी आदी आजारांच्या औषधींची तुटवडा असल्याचे समजते. काही ठिकाणी सिकलसेल तपासणीच्या सोल्युबिलिटी किट्स तसेच रक्तगट तपासणीच्या किट्स उपलब्ध नसल्याने रुग्ण या सेवेपासून वंचित राहत आहेत. यामुळे शासनाची चिट्ठीमुक्त योजना कमकुवत ठरत असून औषधी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागात रुग्णाच्या आरोग्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
साथीच्या आजाराने पुलगावकर झाले बेजार
By admin | Published: August 17, 2016 12:44 AM