अभिनय खोपडे
वर्धा : दिल्ली येथील कृषी भवनात लावलेल्या कृषिमंत्री तालिकेवरून भारताचे पहिले कृषिमंत्री राहिलेले डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब झाल्याचा संतापजनक प्रकार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिल्ली भेटीत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वैदर्भीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.
पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९५२ मध्ये देशात अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. अशा परिस्थितीत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना नेहरू यांनी कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यांनी ती समर्थपणे बजावली. भाऊसाहेबांच्या काळात शेती क्षेत्रात व्यापक बदल करण्यात आले. चांगले बियाणे, वीज, पाणी आदींच्या दृष्टीने शेती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वैदर्भीय भूमिपुत्राची देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून झालेली निवड ही अतिशय अभिमानाची बाब होती. असे असताना दिल्ली येथील कृषी भवनात देशाच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळनिहाय लावलेल्या नामतालिकेतून (फलक) डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा संतापजनक प्रकार असून यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे विचारणा करण्याचा निर्धार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे.
असा झाला उलगडा
अमरावती जिल्ह्यातील काही मान्यवर हे दिल्ली येथे एका समाज संमेलनासाठी गेले होते. त्यांनी कृषी भवनाला भेट दिली. यावेळी कृषी भवनात देशाच्या ३२ कृषिमंत्र्यांची नावे व छायाचित्र झळकताना दिसले. कृषिमंत्र्यांच्या या तालिकेत १९४६ पासून ते आजतागायत सर्व कृषिमंत्र्यांची नावे दिसली. मात्र १९५२ मध्ये कृषिमंत्रीपद भूषविलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव दिसले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत तेथे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
कृषी भवनात फलकावर पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते कृषिमंत्र्यांना विचारणा करणार आहेत.
- रजनीकांत भाई.