वर्धा : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने तरुणांसह बालमनावरही वेगळेच ‘फिवर’ चढविले आहे. अभिनेत्यासारखे डायलॉग, ॲक्शन आणि राहणीमान देखील तरुण अंगिकारू लागले आहेत.
एका १७ वर्षीय मुलाने पुष्पा चित्रपटातील दृश्य डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीचे वागणे व डायलॉग पाहून पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. पोलिसांनाही थक्क करणारा हा प्रकार मंगळवारी दुपारी सेवाग्राम परिसरातील एका शैक्षणिक संस्थेच्या आवारात घडला.
अल्पवयीन आरोपीचा शालेय शिक्षणापासूनच जखमी युवकाशी वाद होता. या वादातून दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. अखेर आरोपीने जखमी केलेल्या अल्पवयीन मुलाला संपविण्याचे ठरविले. यासाठी त्याने ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याचे वागणे अंगिकारले आणि दुपारच्या सुमारास महाविद्यालय परिसरात त्या मुलाला अडवून त्याच्या गळ्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांनी घटनास्थळी पोहोचून अल्पवयीन आरोपी मुलास अटक केली. जखमी मुलाला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस विचारपूस केली असता, आरोपीने पोलिसांना पाहून, तुम मुझे कितना भी मार लो ‘मै झुकेगा नही साला’ असे म्हणत पोलिसांशीही हुज्जत घातली. इतकेच नाही तर, ‘मुझे कुछ भी कर लो, लेकीन मेरे माँ-बाप को कुछ मत करना’ असेही आरोपीने पोलिसांना सांगितले. या अल्पवयीन आरोपी मुलाचे असे वागणे पाहून पोलीसही अचंबित झाले.
पालकांनी पाल्यांकडे लक्ष द्यावे
मंगळवारी दुपारच्या सुमारास सेवाग्राम हद्दीत दोन अल्पवयीन मुलांचा वाद झाला. यात एका मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता, त्याच्यावर ‘पुष्पा’ चित्रपटाचा प्रभाव पडलेला दिसून आला. तो वेगवेगळे डायलॉग मारत होता. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो, काय पाहतो, कुठे जातो हे तपासण्याची गरज आहे. अन्यथा मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नीलेश ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, सेवाग्राम.
आरोपीचे केले समुपदेशन
अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असता, तो फिल्मी डायलॉग मारत होता. पोलीस त्याला समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना सुरुवातीला तो पोलिसांशीही हुज्जत घालत होता. अखेर काही वेळाने डोक्यातील चित्रपटाचे भूत उतरल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचे समुपदेशन केले.