रूपेश खैरी - वर्धा केवळ वृक्षारोपण करून होणार नाही तर त्याचे संगोपण करणे महत्त्वाचे आहे. यात हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याकरिता येथे वेगळीच क्लूप्ती लढविण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना पाणी देण्याकरिता येथे पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स जमा करून त्या अर्ध्या कापून झाडाच्या बु्ंध्याशी लावून त्यात पाणी टाकण्यात येत आहे. वाढत्या तापमानावर आळा घालण्याकरिता वृक्षारोपण हा एकमेव उपाय असल्याचे समोर आले. यामुळे सर्वत्र वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम सुरू झाले. यात शासनाने पुढाकार घेत शतकोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. यात जिल्ह्यात विविध विभागाला वृक्षारोपण करण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असता वृक्षारोपणाकरिता मोकळी जागाच शिल्लक नसल्याचे समोर आले. यामुळे रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या. यानुसार प्रत्येक पंचायत समितीने रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. हिंगणघाट पंचायत समितीला देण्यात आलेले ‘टार्गेट’ पूर्ण करण्याकरिता या क्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. यात कानगाव ग्रामपंचायतीने हिवाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. ते उन्हाळ्याच्या दिवसात वाळणार असे वाटत असताना लावलेली झाडे जगविण्याकरिता त्यांच्या बुंध्याशी पाण्याच्या रिकाम्या बाटली लावण्याचा निर्णय घेतला. या बाटलीत रोज सकाळी व सायंकाळी पाणी टाकण्याकरिता ग्रामपंचायतीच्यावतीने कामगार नियुक्त करण्यात आला. तो नियमित या झाडांच्या बुुंध्यांशी असलेल्या बॉटल्समध्ये पाणी टाकत आहे. यातून भर उन्हाळ्याच्या दिवसात वर्धा-कापसी, वर्धा हिंगणघाट मार्गावर लावलेली झाडे वाचविण्यात आली आहेत. ही वृक्ष लागवड नरेगा अंतर्गत असल्याने त्याची मजुरी त्यातूनच देण्यात येत आहे. या पद्धतीचा सर्वांनी जर अवलंब केला तर वृक्षलागवड नक्कीच यशस्वी होईल.
बुंध्याशी बाटलीत पाणी टाकून झाडे जगविण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 30, 2014 12:02 AM