लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून दत्ता मेघे इंस्टिटट्युट आॅफ मेडीकल सायन्स या संस्थेच्या रूग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे. स्टेट आॅफ आर्ट असलेल्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी केंद्राच्या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सुपर स्पेशालिटी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधांमध्ये गुणात्मक वाढ होण्यास निश्चितच मदत होईल असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खा. रामदास तडस, आ. अरुण अडसड, डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, सागर मेघे, कुलपती दत्ता मेघे, शालिनी मेघे, कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान संस्था विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, डॉ. उपेंद्र कोठेकर, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. झाबिया कोराकिवाला, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, डॉ. अनुपम वर्मा, प्र कुलगुरू डॉ. निलम मिश्रा, डॉ. संदीप श्रीवास्तव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, गणेश खारोडे, डॉ. श्याम भुतडा, डॉ. अभय मुडे, डॉ. अशोक पखान, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी खासदार व कुलपती दत्ता मेघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सागर मेघे यांनी ना. नितीन गडकरी यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जगातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे नागरीकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे ५० कोटी नागरीकांना आरोग्य सुविधेचे कवच मिळाले आहे. या योजनेमुळे प्रत्येक पात्र व्यक्ती पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा प्राप्त करून घेण्यास पात्र ठरला आहे. योजनेमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये देय क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या खासगी संस्थांना ग्रामीण भागात गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहे. त्यांनी गुंतवणूक केल्यास नागरीकांना दर्जेदार सेवा मिळू शकते. ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी यासाठी शासन मदत करेल असेही ते म्हणाले.खासगी, धर्मदाय संस्थानी रूग्णालय उघडावी - गडकरीनितीन गडकरी म्हणाले, देशात आठ लाख डॉक्टरांची गरज आहे. डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार नसल्याने या भागात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खासगी व धर्मदाय संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सुविधा सुधाराची गरज आहे. चांगल्या डॉक्टरांनी या भागात सेवा द्यावी. आता कापोर्रेट क्षेत्रही रुग्णालये सुरु करू शकत असल्याने त्यांनी सेवेसाठी ग्रामीण क्षेत्र निवडावे. आरोग्य सेवेत दर्जेदार सुविधेसोबत स्पर्धाही निर्माण होणे गरजेचे आहे. याचा लाभ रुग्णांना मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भावनेतून कार्य व्हावे. विदर्भात आरोग्य सेवा देण्यात मेघे यांच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालायचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, दत्ता मेघे, वेदप्रकाश मिश्रा वोकहार्ट रुग्णालयाच्या संचालक झाबीयाजी कोराकिवाला यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्यमंत्रीनिधीत ४५ लाखांची केली मदतदत्ता मेघे यांच्या हस्ते मेघे ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ४५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रास्ताविक आ. समीर मेघे यांनी केले. तर आभार सागर मेघे यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. रूग्णालयातील आयसीयू, खासगी रुम, शस्त्रक्रियाकक्षाची पाहणी केली.
सुपर स्पेशालिटी केंद्रामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:51 PM
राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून दत्ता मेघे इंस्टिटट्युट आॅफ मेडीकल सायन्स या संस्थेच्या रूग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्री : शालिनीताई मेघे मल्टी स्पेशालिटी केंद्राचे थाटात लोकार्पण