पाऊण तास रोखला राज्य महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:59 PM2018-06-03T23:59:41+5:302018-06-03T23:59:41+5:30
देशभरात १ जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपात राष्ट्रवादीने उडी घेतली. या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता सावंगी टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल पाऊण तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात १ जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपात राष्ट्रवादीने उडी घेतली. या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता सावंगी टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल पाऊण तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सावंगी (मेघे) पोलिसांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून रस्ता मोकळा केला.
रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात केलेल्या रस्ता रोको आंदोलनात रायुकाँ व राकाँ पदाधिकारी, कार्यकर्ते तथा महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. चार वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नाही. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित दूर कराव्या तसेच शेतमाल, दुधाला भाव, स्वामीनाथन आयोगावर अंमल, शेतकऱ्यांना पेन्शन, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी आदी मागण्या लावून धरल्या. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलिसांनी समीर देशमुख, संदीप किटे, प्रा. खलील खतीब यासह महिला, पुरूष पाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. एक तासानंतर आंदोलकांना मुक्त करण्यात आले. रस्तारोकोमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.